भारतीय बचावपटूंनी केलेल्या सुरेख कामगिरीच्या जोरावर भारताने गुरुवारी बलाढय़ स्पेनविरुद्धची लढत बरोबरीत सोडवली. सलग दुसऱ्या पराभवानंतर भारताने हा सामना १-१ असा बरोबरीत सोडवला. या कामगिरीमुळे भारताने गुणांचे खाते उघडले असून ते एक गुणासह सहा संघांच्या गटात पाचव्या स्थानावर आहेत.
स्पेनच्या गोलक्षेत्रात मनदीपला अडवल्यामुळे भारताला २८व्या मिनिटाला पेनल्टी-स्ट्रोक मिळाला होता. त्याचा पुरेपूर फायदा उठवून भारताच्या रुपिंदरपाल सिंगने संघाचे खाते उघडले. मात्र भारताला हा आनंद फार काळ टिकवता आला नाही. काही मिनिटानंतर रॉक ऑलिव्हा याने मारलेला फटका भारताचा गोलरक्षक पी. आर. श्रीजेशने अडवला. मात्र पुन्हा परतीच्या फटक्यावर ऑलिव्हा याने चेंडूला गोलजाळ्याची दिशा दाखवली. त्यानंतर दोन्ही संघांनी गोल करण्यासाठी बरेच प्रयत्न केले. अखेर १-१ अशा बरोबरीसह सामन्याचा निकाल लागला.
सहाव्या आणि २४व्या मिनिटाला स्पेनला पेनल्टीकॉर्नर मिळाले होते. पण श्रीजेशने सुरेख कामगिरीचे प्रदर्शन करत त्यांचे हे प्रयत्न हाणून पाडले. भारताने गोलाचे खाते खोलल्यानंतर मनदीपला चुकीच्या पद्धतीने पाडल्याप्रकरणी स्पेनचा कर्णधार सान्ती फ्रेक्सियाला पंचांनी हिरवे कार्ड दाखविले. मात्र त्यानंतर लगेचच स्पेनने बरोबरी साधणारा गोल केला. दुसऱ्या सत्रात भारताला दोन तर स्पेनला तीन पेनल्टीकॉर्नर मिळाले. पण दोन्ही संघांना त्यावर निर्णायक गोल लगावता आला नाही. भारताच्या आघाडीवीरांनी त्यांची भूमिका चोख निभावली असती तर या सामन्यात भारताला विजय मिळवता आला असता.

Story img Loader