विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळविण्याची क्षमता भारतीय खेळाडूंमध्ये आहे; मात्र त्यासाठी भारतीय खेळाडूंनी स्वत:च्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे, असे भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक टेरी वॉल्श यांनी सांगितले. विश्वचषक स्पर्धेत भारताची शेवटच्या सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियाशी गाठ पडणार आहे.
ऑस्ट्रेलियाने चार सामनेजिंकून यापूर्वीच उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले आहे. भारतीय संघ चार गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. भारताला पहिल्या दोन सामन्यांत पराभव स्वीकारला लागला असून, तिसऱ्या सामन्यात त्यांनी स्पेनविरुद्ध १-१ अशी बरोबरी स्वीकारत एक गुण मिळविला. शनिवारी त्यांनी मलेशियावर ३-२ अशी मात करीत पहिला विजय मिळविला व आणखी तीन गुणांची कमाई केली.
वॉल्श यांनी पुढे सांगितले की, ‘‘भारतीय संघात तरुण खेळाडूंचा समावेश असून ते ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना चांगली लढत देतील अशी मला खात्री आहे. मात्र त्यासाठी त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. सामन्यातील शेवटच्या मिनिटांमध्ये खेळावरील नियंत्रण त्यांनी गमावता कामा नये. आमच्या खेळाडूंनी नियोजनपूर्वक खेळ करण्याची आवश्यकता आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची लढत किमान बरोबरीत सोडविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. खरे तर हा सामना जिंकण्यासाठीच त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत.’’
भारतीय खेळाडूंकडे हा सामना जिंकण्याची क्षमता आहे का, असे विचारले असता वॉल्श म्हणाले, ‘‘ऑस्ट्रेलियाचे खेळाडू खूप वरचढ आहेत, मात्र त्यांना शेवटपर्यंत चिवट झुंज देण्याची क्षमता आमच्या खेळाडूंमध्ये निश्चित आहे. जर सकारात्मक दृष्टीने आमच्या खेळाडूंनी खेळ केला तर कोणत्याही बलाढय़ संघावर मात करू शकतील अशी मला खात्री आहे. कोणत्या स्थानावर जाऊन गोल करता येतो हे आमच्या खेळाडूंना शिकविलेले आहे, मात्र त्यासाठी त्यांनी पेनल्टी कॉर्नरसारख्या हुकमी संधी वाया घालवू नयेत. ऑस्ट्रेलियाने शनिवारी इंग्लंडचा ५-० असा धुव्वा उडविला होता. आमच्याकडे विश्वचषक राखण्याची क्षमता आहे हे कांगारूंनी दाखवून दिले आहे. ज्येष्ठ ऑलिम्पिकपटू व अव्वल दर्जाचे प्रशिक्षक रिक चार्ल्सवर्थ यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले आहे. चार्ल्सवर्थ यांच्याकडे संघाचे नेतृत्व असताना ऑस्ट्रेलियाने १९८६ मध्ये विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर २०१० मध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा ऑस्ट्रेलियाने विजेतेपद मिळविले होते.’’ भारताचा कर्णधार सरदारासिंग म्हणाला की, ‘‘प्रत्येक सामन्यात आमच्या कामगिरीत सुधारणा होत आहे. पहिल्या दोन लढतींत आम्ही शेवटच्या एक मिनिटात पराभव स्वीकारला. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्ध आम्ही विजय मिळवण्यासाठीच खेळणार आहोत.’’

Story img Loader