हॉकी विश्वचषकासाठी भारतीय संघाची शुक्रवारी (२३ डिसेंबर) घोषणा करण्यात आली. १८ सदस्यीय संघाचे कर्णधारपद बचावपटू हरमनप्रीत कौरकडे सोपवण्यात आले आहे. तो मनप्रीत सिंगच्या जागी संघाची धुरा सांभाळणार आहे. १३ जानेवारीपासून ओडिशामध्ये हॉकी विश्वचषक स्पर्धा होणार आहे. अंतिम सामना २९ जानेवारीला होणार आहे. ओडिशाची राजधानी भुवनेश्वर आणि राउरकेला येथे हे सामने होणार आहेत.
बचावपटू अमित रोहिदासला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. हरमनप्रीतने अलीकडेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत संघाची धुरा सांभाळली होती. पाच सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाचा १-४ असा पराभव झाला. मिडफिल्डर मनप्रीत सिंगने टोकियो ऑलिम्पिकमध्ये संघाचे नेतृत्व केले होते. त्यानंतर टीम इंडियाने ऐतिहासिक कांस्यपदक जिंकले.
ग्रॅहम रीड वेगवेगळे कर्णधार बनवत आहेत
भारताचे प्रशिक्षक ग्रॅहम रीड हे संघातील वेगवेगळ्या खेळाडूंना कर्णधारपद देण्यासाठी ओळखले जातात. त्यामुळे वरिष्ठ खेळाडू अधिक जबाबदार ठरतात, असे त्याचे मत आहे. अमित रोहिदासनेही संघाचे नेतृत्व केले आहे. बेंगळुरू येथील स्पोर्ट्स ऑथोरेटी ऑफ इंडियाच्या (SAI) केंद्रात दोन दिवसांच्या चाचणीनंतर विश्वचषक संघाची निवड करण्यात आली. ३३ खेळाडूंनी चाचण्यांमध्ये भाग घेतला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळलेले गुरजंत सिंग आणि दिलप्रीत सिंग हे मुख्य संघात नसले तरी दोघेही स्टँडबाय म्हणून विश्वचषक संघासोबत असतील.
भारताचे वेळापत्रक
विश्वचषकातील भारतीय संघ राउरकेला येथील नव्याने बांधलेल्या बिरसा मुंडा हॉकी स्टेडियमवर १३ जानेवारी रोजी स्पेनविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. टीम इंडिया या मैदानावर पूल-डीमध्ये इंग्लंडशी भिडणार आहे. यानंतर ती भुवनेश्वरमध्ये वेल्सविरुद्ध तिसरा सामना खेळणार आहे. २२ जानेवारीपासून बाद फेरीचे सामने सुरू होतील. २२ आणि २३ जानेवारीला क्रॉसओव्हर सामने खेळवले जातील. उपांत्यपूर्व फेरी २५ जानेवारीला तर उपांत्य फेरी २७ जानेवारीला होणार आहे. २९ जानेवारीला अंतिम आणि कांस्यपदकाचा सामना होणार आहे.
हॉकी विश्वचषकासाठी भारतीय संघ
गोलरक्षक: कृष्ण बहादूर पाठक आणि पीआर श्रीजेश.
बचावपटू : जर्मनप्रीत सिंग, सुरेंदर कुमार, हरमनप्रीत सिंग (कर्णधार), वरुण कुमार, अमित रोहिदास (उपकर्णधार), नीलम संजीप.
मिडफिल्डर : मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, नीलकंता शर्मा, समशेर सिंग, विवेक सागर प्रसाद, आकाशदीप सिंग.
फॉरवर्ड: मनदीप सिंग, ललित कुमार उपाध्याय, अभिषेक आणि सुखजित सिंग.
राखीव खेळाडू: राजकुमार पाल आणि जुगराज सिंग.