दोन सलग पराभवांमुळे भारतीय संघ खचला आहे. त्यामुळे आता आव्हान टिकवण्यासाठी भारतीय संघावरील दडपण वाढले आहे. गुरुवारी ग्रीनफिल्ड्स स्टेडियमवर भारतीय हॉकी संघाचा सामना होणार आहे तो बलाढय़ स्पेनशी.
बेल्जियम आणि इंग्लंडविरुद्धच्या सामन्यांमध्ये भारताने तोलामोलाची टक्कर दिली, परंतु विजयापासून भारत दूरच राहिला. स्पेनविरुद्धच्या सामन्यात भारताच्या बचावाला अधिक भक्कमपणे उभे राहावे लागणार आहे. २०१३च्या जागतिक लीग हॉकी स्पध्रेतील पाचव्या क्रमांकाच्या लढतीत स्पेनने भारताचा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव केला होता.
आर्थिक अडचणींमुळे स्पेनच्या हॉकी संघाला गेली दोन वष्रे काही मोठय़ा स्पर्धापासून दूर राहावे लागले होते. परंतु सँटी फ्रेक्सिया आणि इडय़ूर्ड तुबाऊ यांच्यापासून भारताला सावध राहावे लागणार आहे.
भारतीय संघाचे तांत्रिक संचालक रोलँट ओल्टमन्स यांनी सांगितले की, ‘‘स्पेन संघातील काही दर्जेदार आघाडीपटूंपासून भारताला धोका आहे. परंतु दोन पराभवांतून मार्ग काढत भारतीय संघ व्यावसायिकपणे आपल्या बहारदार खेळाचे प्रदर्शन करतील. स्पॅनिश प्रतिस्पध्र्याना हरवण्यासाठी भारताला सांघिक खेळाचे प्रदर्शन करावे लागणार आहे.’’
स्पेनच्या संघाची कामगिरीसुद्धा फारशी समाधानकारक नाही. पहिल्या लढतीत इंग्लंडला त्यांनी १-१ असे बरोबरीत रोखले. मग गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने त्यांना ३-० असे पराभूत केले. स्पेनचे प्रशिक्षक सॅल्व्हाडर इंडय़ुरेन मात्र संघ उपांत्य फेरीत पोहोचेल, याबाबत आशावादी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hockey world cup spains seasoned strikers present
Show comments