हॉकी विश्वचषक २०२३ ची ट्रॉफी देशातील अनेक राज्यांमधून फिरून दिल्लीत पोहोचली. यावेळी १३ जानेवारी ते २९ जानेवारी या कालावधीत ओडिशामध्ये हॉकी विश्वचषक स्पर्धा होणार आहे. दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते या ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी हॉकीपटू अशोक ध्यानचंद, माजी कर्णधार अजित पाल सिंग, ज्यांनी १९७५ मध्ये भारताला पहिला हॉकी विश्वचषक जिंकून दिला होता ते आणि त्याशिवाय हॉकी इंडियाचे अनेक अधिकारीही यावेळी उपस्थित होते.
१९७५ व्या विश्वविजयाची पुनरावृत्ती करीत २०२३ ला मायदेशात भारतीय हॉकी संघ पुन्हा एकदा विश्वचषक जिंकून नव्या पिढीसाठी प्रेरणास्पद कामगिरी नक्की करेल, असा विश्वास केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर आणि हॉकीतील माजी दिग्गजांनी शुक्रवारी व्यक्त केला. १३ ते २९ जानेवारी या कालावधीत भुवनेश्वर आणि राऊरकेला येथे विश्वचषकाचे आयोजन होणार आहे. येथे आल्यानंतर क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रथम मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले आणि त्यानंतर विश्वचषक ट्रॉफीचे अनावरण केले. यावेळी अनेक शाळांचे युवा खेळाडूही उपस्थित होते. पुतळ्याच्या अनावरणानंतर अनुराग ठाकूर म्हणाले की, “मेजर ध्यानचंद हे भारतीय हॉकीचा अभिमान आणि सर्वांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत.”
विश्वचषकातील चषकाचे अनावरण केल्यानंतर क्रीडामंत्री म्हणाले, “भारतीय संघ सज्ज असून अन्य १५ संघांचे आव्हान मोडीत काढण्याची आमच्या खेळाडूंची तयारी आहे. माझ्या मते, मायदेशात आमचा संघ विश्वविजेता नक्की बनू शकतो. भारतीय संघाची तयारी, खेळाडूंमधील नवी ऊर्जा आणि आत्मविश्वास पाहून मला विश्वास आहे की भारत नक्की विश्वविजेता होईल. आम्ही विश्वचषक आणि आगामी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करू.” त्याचबरोबर भारतीय पुरुष हॉकी संघाविषयी ते म्हणाले की, “या संघाने गेल्या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून ४१ वर्षांचा दुष्काळ संपवला आणि पुन्हा एकदा भारतीय संघ विश्वविजेता बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांनी भारतीय महिला हॉकी संघाचेही कौतुक केले आणि सांगितले की या संघाने ऑलिम्पिकमध्ये चौथे स्थान मिळवून देशाचे नाव उंचावले आहे.”
१९८० च्या ऑलिम्पिक विजेत्या टीम इंडियाचे खेळाडू झफर इक्बाल म्हणाले, “भारतीय संघ प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. आता आमचे खेळाडू उच्च दर्जाची हॉकी खेळतात, यात शंका नाही. जर्मनी, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम आणि नेदरलँड यांच्याविरुद्ध खेळून जिंकू शकतो, असा विश्वास खेळाडूंमध्ये आला आहे. आघाडीचे चार-पाच संघ एकसारखा खेळ करतात. भारताने ऑलिम्पिक कांस्य जिंकून स्वत:ला सिद्ध केले. विश्वचषक जिंकण्याची जिद्द , कुवत आणि विश्वास या संघात असल्याने भारतीय संघ चषक उंचावेल, असा मला विश्वास वाटतो.”
नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच २०२३ च्या सुरुवातीला, १३ ते २९ जानेवारी दरम्यान, भुवनेश्वर आणि राउरकेला संयुक्तपणे FIH पुरुष हॉकी विश्वचषक २०२३ (हॉकी वर्ल्ड कप ट्रॉफी रिव्हल) च्या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करतील. विशेष म्हणजे, भारताने शेवटचा विश्वचषक ४७ वर्षांपूर्वी १९७५ च्या क्वालालंपूरमध्ये जिंकला होता. अशा परिस्थितीत भारतीय संघाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत.