दडपणाखाली खेळणाऱ्या भारताच्या बचावावर जोरदार आक्रमण करीत ऑस्ट्रेलियाने ६-२ अशा फरकाने शानदार विजय मिळवला आणि जागतिक हॉकी लीगमधील पुरुष गटात अपराजित्व राखले. तीन गोल करणारा ख्रिस्तोफर सिरेल्लोने ऑस्ट्रेलियाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.
विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाने पूर्वार्धात ३-० अशी भक्कम आघाडी घेतली होती. त्या वेळी त्यांच्याकडून अॅरन अॅलेवस्की (७वे मिनिट), जेमी डायर (१२वे मिनिट) व ख्रिस्तोफर सिरेल्लो (२६वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल केला. उत्तरार्धात सिरेल्लोने ३३व्या व ४४व्या मिनिटाला गोल केले तर किरॉन गोव्हर्सने ४२व्या मिनिटाला गोल करीत कांगारूंचे वर्चस्व राखले. भारताकडून बीरेंद्र लाक्राने ३४व्या मिनिटाला तर रमणदीप सिंगने ५१व्या मिनिटाला गोल केला. अझलन शाह चषक स्पर्धेत भारताकडून झालेल्या पराभवाची सहज परतफेड करीत कांगारूंनी भारताच्या खेळातील मर्यादा पुन्हा स्पष्ट केल्या.
सामन्याच्या प्रारंभापासूनच कांगारूंनी निर्विवाद वर्चस्व गाजवले. जोरदार चाली व भक्कम बचाव असा चतुरस्र खेळ करीत त्यांनी भारतीय खेळाडूंवर सातत्याने दडपण ठेवले. उत्कृष्ट सांघिक खेळाचा त्यांनी प्रत्यय घडवला. भारताच्या बऱ्याचशा चाली त्यांनी डी-क्षेत्रापूर्वीच रोखल्या. पूर्वार्धात केवळ तीन वेळा भारताला गोलपोस्टजवळ जाण्याची संधी मिळाली, मात्र त्याचा फायदा त्यांना घेता आला नाही. या स्पर्धेतील अगोदरच्या सामन्यांमध्ये त्यांनी दाखविलेल्या सांघिक खेळाचा येथे अभावच दिसला. ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी खेळाडूनुसार रणनीतीचा उपयोग करीत भारताच्या चालींमधील हवाच काढून घेतली होती. सातव्या मिनिटाला त्यांच्या अॅलेवस्कीने गोल करीत संघाचे खाते उघडले. या धक्क्यातून भारतीय खेळाडू सावरण्यापूर्वीच त्यांचा नामवंत खेळाडू डायरने आणखी एक गोल केला. पूर्वार्ध संपण्यास चार मिनिटे बाकी असताना त्यांना पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्यावर कांगारूंच्या खेळाडूंनी केलेली चाल भारताचा गोलरक्षक पी.आर.श्रीजेशने परतवली, मात्र सिरेल्लोने शिताफीने चाल करीत चेंडू गोलात तटवला.
उत्तरार्धात तिसऱ्याच मिनिटाला सिरेल्लोने भारताचा गोलरक्षक श्रीजेशला निमिषार्धात चकवत गोल केला. भारताने जोरदार आक्रमण करीत चौथ्याच मिनिटाला पेनल्टी कॉर्नरची संधी प्राप्त केली. त्याचा फायदा घेत बीरेंद्र लाक्राने गोल करीत ऑस्ट्रेलियाची आघाडी कमी केली, मात्र त्यांचा हा आनंद फार वेळ टिकला नाही. कांगारूंनी ४२व्या व ४४व्या मिनिटाला गोल करीत ६-१ अशी भक्कम आघाडी घेतली. ४२व्या मिनिटाला किरॉन गोव्हर्सने डाव्या हाताने सुरेख गोल केला. पाठोपाठ दोन मिनिटांनी त्यांना पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्याचा फायदा घेत सिरेल्लोने भारताच्या दोन बचावरक्षकांना चकवत अप्रतिम गोल केला. त्यानंतर भारताने गोल करण्यासाठी चांगल्या चाली केल्या. अखेर ५१व्या मिनिटाला त्यांना चांगली संधी लाभली. धरमवीर सिंगने दिलेल्या पासवर रमणदीप सिंगने सुरेख गोल केला. या स्पर्धेत आतापर्यंत ऑस्ट्रेलियाने प्रथमच दोन गोल स्वीकारले आहेत.
भारताची शरणागती
भारताच्या बचावावर जोरदार आक्रमण करीत ऑस्ट्रेलियाने ६-२ अशा फरकाने शानदार विजय मिळवला आणि जागतिक हॉकी लीगमधील पुरुष गटात अपराजित्व राखले.
First published on: 29-06-2015 at 03:20 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hockey world league semifinal australia beat india 6