नवी दिल्ली : पुढील वर्षी आशिया चषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार की नाही, याबाबतचा अंतिम निर्णय गृहमंत्रालयाकडून घेतला जाईल, असे केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी गुरुवारी स्पष्ट केले.
पुढील वर्षीच्या आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला मिळाले आहे. मात्र, भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नाही आणि ही स्पर्धा त्रयस्थ ठिकाणी खेळवण्यात यावी, असे वक्तव्य भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शहा यांनी केले होते. शहा हे आशियाई क्रिकेट परिषदेचेही (एसीसी) अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करणे योग्य नसल्याचे पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) म्हटले आहे. तसेच भारतीय संघ पाकिस्तानात न आल्यास, पाकिस्तानचा संघ पुढील वर्षीच भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकातून माघार घेईल, असा इशाराही ‘पीसीबी’ने दिला आहे. मात्र, पाकिस्तानचा संघ एकदिवसीय विश्वचषकात खेळेल, असा विश्वास अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केला.
‘‘भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी जे संघ पात्र ठरतील, त्यांचे आम्ही स्वागत करू. पाकिस्तानच्या संघाने अनेकदा भारताचा दौरा केला आहे. अनेक सामने खेळले आहेत. विश्वचषकात सर्व आघाडीचे संघ खेळतील अशी मला अपेक्षा आहे,’’ असे ठाकूर म्हणाले. तसेच भारताने एखाद्या मुद्दय़ावर कोणती भूमिका घ्यावी, हे कोणीही सांगण्याची आवश्यकता नाही, असेही ठाकूर यांनी स्पष्ट केले.
भारतीय संघ पाकिस्तानात जाण्याबाबत विचारले असता ठाकूर म्हणाले, ‘‘काहीही घडू शकते. मात्र, भारतीय संघ पाकिस्तानात जाण्याची शक्यता फार कमी आहे. याबाबतचा अंतिम निर्णय गृहमंत्रालयाकडून घेतला जाईल. खेळाडूंची सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे. वेळ आल्यावर तेथील परिस्थिती पाहून सरकार योग्य तो निर्णय घेईल.’’
सरकारचा अंतिम निर्णय -बिन्नी
बंगळूरु : भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवण्याचा निर्णय ‘बीसीसीआय’च्या हातात नाही. याबाबतचा अंतिम निर्णय केंद्र सरकारकडून घेतला जाईल, असे ‘बीसीसीआय’चे नवनिर्वाचित अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी सांगितले. ‘‘देश सोडण्यासाठी आम्हाला सरकारकडून परवानगी मिळणे गरजेचे आहे. सरकारच्या निर्णयानंतरच आम्ही पुढील पावले उचलू,’’ असे बिन्नी म्हणाले.