होंडुरास हा दिग्गज फुटबॉल संघांच्या मांदियाळीत कधीच नव्हता. फिफाच्या प्रतिष्ठेच्या स्पर्धामध्येही होंडुरासचा संघ अभावानेच दिसायचा. पण गेल्या काही वर्षांपासून होंडुरासने फुटबॉल हा खेळ गांभीर्याने घेतला असून आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची झालेली प्रगती पाहून त्याची प्रचीती नक्कीच येते. २००१च्या कोपा अमेरिका स्पर्धेला सुरुवात होण्याच्या एक दिवसआधी अर्जेटिनाने माघार घेतल्यामुळे शेवटच्या क्षणी होंडुरासला सहभागाची संधी मिळाली. पण या संधीचे सोने करत होंडुरासने तिसरे स्थान पटकावत संपूर्ण जगाला आपली दखल घेण्यास भाग पाडले.
कोंसासॅफ गटात असलेले मेक्सिको आणि अमेरिकेसारख्या संघाचे वर्चस्व पाहता, होंडुरास हा संघ फिफा क्रमवारीत अव्वल ५० जणांमध्ये कधीच नव्हता. त्यामुळे फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी हा संघ कधी पात्र ठरेल, याची कुणालाही शाश्वती नव्हती. पण एक उभरता संघ म्हणून होंडुरासने केलेली प्रगती थक्क करणारी आहे. २०१०च्या फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी वर्षभरापूर्वीच स्थान मिळवत होंडुरासने आपल्या गुणवत्तेची छाप पाडली. १९८२नंतर प्रथमच होंडुरास संघ फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरला होता. आता बलाढय़ संघ बनवून त्यांनी ब्राझीलमध्ये होणाऱ्या फिफा विश्वचषकातही स्थान मिळवले आहे. पात्रता फेरीत मेक्सिको आणि पनामा या संघांना मागे टाकून होंडुरासने तिसऱ्यांदा फिफा विश्वचषकवारी पक्की केली. आता या वेळी होंडुरासकडून देशवासीयांना चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. अनुभवी प्रशिक्षक लुइस फर्नाडो सुआरेझ यांनी इक्वेडोरला २००६मध्ये बाद फेरीत पोहाचवले होते. या वेळी ते होंडुरासला कितपय यश मिळवून देतात, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
होंडुरास (इ-गट)
*फिफा क्रमवारीतील स्थान : ३०

विश्वचषकातील कामगिरी
*सहभाग : ३ वेळा (२०१४ सह)

संघ
गोलरक्षक : नोएल व्ॉलाडरेस, डोनिस इस्कोबेर, लुइस लोपेझ. बचावफळी : ब्रायन बेकेलेस, इमिलियो इझागुएरे, जुआन कालरेस गार्सिया, मेयनोर फिगुएरो, विक्टर बर्नारडेझ, ओस्मान चावेझ, जुआन पाबलो माँटेस. मधली फळी : आरनॉल्ड पेराल्टा, लुइस गॅरिडो, रॉजर इस्पिनोझा, जॉर्ज क्लॅरोस, विल्सन पॅलासियोस, ऑस्कर गार्सिया, अँडी नजार, मारियो मार्टिनेझ, मार्विन चावेझ. आघाडीवीर : जेरी बेंगट्सन, जेरी पॅलासियोस, कालरे कॉस्टली, रॉनी मार्टिनेझ.
*व्यूहरचना : ४-४-२
*प्रशिक्षक : लुइस फर्नाडो सुआरेझ
बलस्थाने व कच्चे दुवे
प्रीमिअर लीगमध्ये २०११चा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावलेला सेल्टिक एफसीचा इमिलियो इझागुएरे याच्यावर मधल्या फळीची भिस्त असणार आहे. स्टोक सिटीतर्फे खेळणाऱ्या विल्सन पॅलासियोसवर होंडुरासला बाद फेरीत पोहोचवण्याची जबाबदारी असणार आहे. कालरे कॉस्टली आणि जेरी बेंगट्सन हे दोन्ही आघाडीवीर आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी ठरल्यामुळे त्यांच्याकडून चांगली कामगिरी अपेक्षित आहे. होंडुरासची बचाव फळी सर्वात कमकुवत मानली जात आहे. मात्र मेयनोर फिगुएरो आणि जुआन कालरेस गार्सियासारखे चांगले बचावपटू त्यांच्याकडे आहेत.
अपेक्षित कामगिरी
होंडुरासचा विद्यमान संघ हा सर्वोत्तम मानला जात असल्यामुळे या संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा बाळगली जात आहे. एक चांगला संघ या नात्याने ई गटात त्यांच्या जिंकण्याच्या शक्यता वाढल्या आहेत. १९८२ आणि २०१०नंतरची ही त्यांची तिसरी विश्वचषक वारी आहे. दोन्ही वेळेला बाद फेरीत स्थान मिळवल्यामुळे या वेळेला त्यांच्याकडून अपेक्षा उंचावल्या आहेत. मात्र ई गटात फ्रान्स आणि स्वित्र्झलडसारखे मातब्बर संघ आणि इक्वेडोरसारखा तुल्यबळ संघ असल्यामुळे त्यांचे आव्हान पहिल्या फेरीतच संपुष्टात येण्याची शक्यता अधिक आहे.  गोल करण्याच्या क्षमतेचा अभाव यामुळे ते गटात एकही सामना जिंकू शकणार नाहीत. त्यामुळे बाद फेरीत मजल मारण्यासाठी होंडुरासला काही तरी विशेष कामगिरी करावी लागणार आहे.

Story img Loader