ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायना नेहवालने पदक जिंकून आता वर्ष उलटले आहे. यशासाठी झगडायला लावणाऱ्या या हंगामाचा शेवट गोड करण्यासाठी आता सायना सज्ज झाली आहे. बुधवारपासून सुरू होणाऱ्या साडेतीन लाख डॉलर्स पारितोषिक रकमेच्या हाँगकाँग सुपर सीरिज स्पध्रेद्वारे हंगामातील पहिल्या जेतेपदावर नाव कोरण्यासाठी ती उत्सुक आहे.
ऑक्टोबर २०१२मध्ये डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पध्रेचे विजेतेपद तिने पटकावले होते. त्यानंतर वारंवार तिला यशाने हुलकावणी दिली होती. महिला एकेरीत सातव्या मानांकित सायनाची सलामीची लढत इंडोनेशियाच्या बेलाट्रिक्स मनूपुट्टीशी होणार आहे.
दुखापती आणि सातत्यपूर्ण कामगिरीचा अभाव यामुळे २३ वर्षीय सायनासाठी हा हंगाम खडतर ठरला आहे. गेल्याच आठवडय़ात चीनच्या बिगरमानांकित सन यूकडून पराभूत झाल्यामुळे चायना खुल्या स्पध्रेत सायनाचे आव्हान दुसऱ्याच फेरीत संपुष्टात झाले होते. तिने पहिला अडथळा पार केल्यास जपानची ईरिको हिरोसे किंवा थायलंडच्या पोर्नटिप बुरानाप्रासर्टसक यांच्याशी दुसऱ्या फेरीत तिची गाठ पडेल. दुसरी फेरी पार केल्यावर उपांत्यपूर्व फेरीत जागतिक क्रमवारीतील पहिल्या स्थानावरील लि झुरूईशी तिचा मुकाबला होऊ शकेल.
महिला एकेरीमधील भारताचे आणखी एक आव्हान पी. व्ही. सिंधूचा सामना थायलंडच्या दुसऱ्या मानांकित रॅटचानोक इन्टॅनॉनशी होणार आहे. चालू वर्षी ऑगस्टमध्ये चीन येथे झालेल्या
जागतिक अजिंक्यपद स्पध्रेत सिंधूने रॅटचानोककडूनच पराभव पत्करला होता.
पुरुष एकेरीत के. श्रीकांत, अजय जयराम आणि परुपल्ली कश्यप यांच्या खांद्यावर भारतीय आव्हानाची जबाबदारी असेल. श्रीकांतची पहिल्याच फेरीत जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थानावरील आणि अव्वल मानांकित ली चोंग वेईशी गाठ पडणार आहे. कश्यपची सलामी चीनच्या झेंगमिंग वांगशी रंगणार आहे. जर त्याने पहिल्या फेरीचा अडसर पार केला तर, दुसऱ्या फेरीत चीनचाच चेंग लाँगशी त्याचा सामना होईल. जयरामचा सलामीचा सामना व्हिएटनामच्या सातव्या मानांकित टिएन मिन नग्युएनशी होणार आहे. पुरुष दुहेरीत प्रणव जेरी चोप्रा आणि अक्षय देवलकर भारताचे प्रतिनिधित्व करतील. याचप्रमाणे मिश्र दुहेरीत तरुण कोना आणि अश्विनी पोनप्पा यांच्यावर भारताची मदार असेल.

Story img Loader