भारतातील कुस्ती स्पर्धामधील मानाचा ‘महाराष्ट्र केसरी’ हा किताब सलग तिसऱ्यांदा पटकावत मुंबईचा ऑलिम्पिकपटू नरसिंग यादवने एक नवा इतिहास रचला आहे. कुस्तीमधील त्याची ही ऐतिहासिक कामगिरी, कुस्तीमध्ये होणारे बदल, त्यासाठी करावी लागणारी तयारी याविषयी बातचीत करणाऱ्या नरसिंगने ऑलिम्पिक पदक हेच स्वप्न आपण जोपासले असल्याचे सांगितले.
‘महाराष्ट्र केसरी’ हा मानाचा किताब सलग तिसऱ्यांदा पटकावत तू इतिहास रचलास, या विजेतेपदानंतर तुझ्या काय भावना होत्या?
आतापर्यंत पाच मल्लांनी दोनदा हा किताब पटकावला असल्याने विजेतेपदाची हॅट्ट्रिक साधण्याचा विक्रम मला स्पध्रेआधी खुणावत होता. त्यामुळेच विजेतेपदाचे स्वप्न साकारल्याने मला खूप आनंद झाला. ज्यासाठी मी अथक मेहनत घेतली, त्याचेच हे फळ आहे. भारतामध्ये ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येकाला या किताबाला गवसणी घालण्याची इच्छा असते. गेली दोन वर्षे हा किताब जिंकल्याने मनोबल उंचावलेले होते, कसून सरावही केला होता आणि त्यामुळेच मला इतिहास रचता आला.
या स्पर्धेत प्रतिस्पध्र्याला तू एकही गुण कमवू दिला नाहीस, याचे रहस्य काय आहे?
अथक मेहनत, कसून केलेला सराव आणि जिद्द ही या यशाची त्रिसूत्री आहे. त्याचबरोबर मी सध्या नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये सराव करत असून, येथील संजय बर्वे यांचे अमूल्य मार्गदर्शन मला मिळत आहे.
या स्पर्धेचे वातावरण कसे होते?
महाराष्ट्रात नेहमीच कुस्तीला पोषक वातावरण पाहायला मिळते. भोसरीचे मैदान हजारो कुस्तीप्रेमींनी भरलेले होते. हे वातावरण कुस्तीसाठी नक्कीच आल्हाददायक होते. मलाही प्रत्येक वेळी भरघोस पाठिंबा मिळाला.
सध्याच्या कुस्तीमध्ये नवीन बदल पाहायला मिळतात. कुस्तीचे विकसित तंत्र आणि नवीन नियम खेळाला किती फायदेशीर ठरत आहेत?
सुरुवातीला कुस्ती हा फक्त ताकदीचा खेळ समजला जायचा. पण सध्याचा खेळ फार बदलला आहे. ताकदीबरोबरच वेग, चपळता, तंत्र आणि नवीन नियमांमुळे सध्याची कुस्ती थोडी जलद झाली आहे. विकसित तंत्र आणि नवीन नियमांचा नक्कीच कुस्तीला फायदा होणार आहे.
हे नवीन तंत्र तू कसे आत्मसात करतोस?
यासाठी लंडन ऑलिम्पिकचा मला फार फायदा झाला. ऑलिम्पिकमध्ये नावाजलेल्या मल्लांची कुस्ती, त्यांचे तंत्र पाहायला मिळाले. त्यामुळे आपल्यामध्ये काय कमतरता आहेत आणि कशावर जोर द्यायला हवा, हे समजले. त्याचबरोबर मोठय़ा मल्लांच्या खेळाचे ‘व्हिडीओ’ पाहून त्यांचे तंत्र समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे.
आता यापुढचे ध्येय काय आहे?
जेव्हापासून कुस्तीला सुरुवात केली, तेव्हापासून ऑलिम्पिक पदक पटकावण्याचेच स्वप्न उराशी बाळगलेले आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये मला चांगली कामगिरी करता आली नाही, पण त्यामधून बरेच काही शिकलो आहे. आगामी वर्षांतील आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धाची तयारी करत आहे, पण डोळ्यांपुढे मात्र ऑलिम्पिक पदक जिंकण्याचेच ध्येय आहे.

Story img Loader