खराब फॉर्ममुळे सर्वाच्याच टीकेचा धनी बनलेल्या सचिन तेंडुलकरला त्याचा एकेकाळचा सहकारी आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने पाठिंबा दिला आहे. ईडन गार्डन्सवर सचिन शतक झळकावेल, अशी मला आशा आहे, असे गांगुलीने सांगत सचिनला एक प्रकारे दिलासाच दिला आहे.
भारतीय संघातील सर्व खेळाडू उपस्थित असलेल्या कार्यक्रमात गांगुली म्हणाला, ‘‘इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याबाबत नानाविध बातम्या वृत्तपत्रात छापून येत आहेत. पण माझा पाठिंबा सचिनला आहे. ईडन गार्डन्सवर शतक झळकावून सचिन पुन्हा एकदा टीकाकारांची तोंडे बंद करेल, अशी आशा आहे.’’ या वेळी गांगुलीसह सचिन आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनीही उपस्थित होता.
भारतीय संघाच्या कामगिरीबाबत गांगुलीने सांगितले की, ‘‘भारत जोमाने मुसंडी मारेल आणि ही मालिका जिंकेल, याची मला खात्री आहे. इंग्लंडने मुंबई कसोटी जिंकून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली असली तरी भारतच ही मालिका जिंकेल, असे मला वाटते.’’

Story img Loader