उत्तर प्रदेशविरुद्धच्या रणजी सामन्यात झळकावलेल्या शतकानंतर भारताचा सलामीवीर वीरेंद्र सेहवागने आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे. इंग्लंडविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत मी चांगला फॉर्म कायम राखण्याचा प्रयत्न करणार आहे. ही मालिका जिंकण्याचे आमचे ध्येय आहे, असे सेहवागने सांगितले.
‘‘उत्तर प्रदेशविरुद्ध शतक साजरे केल्याने मी समाधानी आहे. आता इंग्लंडविरुद्ध चांगली कामगिरी करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. इंग्लंडविरुद्ध आमची कामगिरी सुरेख होत आली आहे. ९ नोव्हेंबरपासून आमचे सराव शिबीर आयोजित करण्यात आले आहे. माझ्या मते, ही मालिका दोन्ही संघांसाठी आव्हानात्मक असणार आहे. ही मालिका कधी सुरू होतेय, यासाठी मी आतुर आहे,’’ असेही त्याने सांगितले.
इंग्लंड दौऱ्यात भारताला ०-४ असा सपाटून मार खावा लागला होता, पण ही मालिका पराभवाचा वचपा काढण्यासाठी नाही, असेही सेहवागने स्पष्ट केले. तो म्हणाला, ‘‘बदला घेण्यासाठी आम्ही खेळणार नाहीत. देशासाठी आणि संघासाठी चांगली कामगिरी करण्यावर आमचा भर राहील.’’
रणजी सामन्यात बोटाला झालेल्या दुखापतीबद्दल विचारले असता तो म्हणाला, ‘‘दिवसेंदिवस दुखापतीत सुधारणा होत आहे. सद्यस्थितीला मला कोणत्याही वेदना होत नाहीत. या सामन्यात आम्ही सर्वोत्तम प्रदर्शन केले तरी आम्हाला सामना अनिर्णित राखण्यात अपयश आल्याने मी निराश झालो. दुखापतीमुळे मला मधल्या फळीत खेळावे लागले. स्थानिक डॉक्टरांनी वेळेवर उपचार केले नाहीत.’’
कसोटी क्रिकेटमध्ये ९८ सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व करणारा सेहवाग इंग्लंडविरुद्ध सामन्यांचे शतक साजरे करणार आहे. याविषयी सेहवागने सांगितले, ‘‘देशाचे प्रतिनिधित्व करावे, हे माझे स्वप्न होते. ते पूर्ण झाले असले तरी जास्तीत जास्त सामने खेळून भारताला विजय मिळवून द्यावा, हे स्वप्न मी उराशी बाळगले आहे. लवकरच शतकी पल्ला गाठणार असल्याने मी आनंदी आहे.’’ सेहवागसह गौतम गंभीर, मुरली विजय आणि अजिंक्य रहाणे या चार सलामीवीरांना निवड समितीने संघात स्थान दिले आहे, याविषयी भाष्य करण्यास सेहवागने नकार दिला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा