गेली २४ वर्षे चाहत्यांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर वावरला, बऱ्याचदा त्याने अपेक्षांची पूर्तताही केली आणि आता कारकिर्दीच्या शेवटीही आपल्या चाहत्यांचा आणि त्यांच्या अपेक्षांचा विसर त्याला पडलेला नाही. वेस्ट इंडिजविरुद्धच्या अखेरच्या दोन कसोटी सामन्यांच्या वेळी या अपेक्षा पूर्ण करण्याची आशा सचिनने व्यक्त केली आहे. पहिल्या रणजी सामन्यात मुंबईला विजय मिळवून दिल्यानंतर आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेची तो आतुरतेने वाट पाहत आहे.
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्ध सचिन आपला ऐतिहासिक दोनशेवा सामना खेळणार असून रणजीच्या शेवटच्या सामन्याप्रमाणेच हा सामनाही सचिन अविस्मरणीय करतो का, याकडे साऱ्यांचेच लक्ष लागलेले असेल.
‘‘ही एक चांगली मालिका असेल. वेस्ट इंडिजचा संघ चांगलाच दर्जेदार असून माझे अखेरचे दोन कसोटी सामने त्यांच्याबरोबर असतील. मला अशी आशा आहे की, या मालिकेत चांगले क्रिकेट खेळले जाईल आणि सर्व माझ्या चाहत्यांच्या अपेक्षांवर मी खरा उतरू शकेन,’’ असे सचिनने मुंबईला विजय मिळवून दिल्यानंतर सांगितले.
हरयाणाविरुद्धच्या सामन्याविषयी सचिन म्हणाला की, लाहिलीची खेळपट्टी आव्हानात्मक होती. गोलंदाजांसाठी खेळपट्टी पोषक असल्याने फलंदाजी करताना मजा आली. विजयासाठीचे २४० धावांचे लक्ष्य आव्हानात्मक होते.
चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करीन!
गेली २४ वर्षे चाहत्यांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर वावरला, बऱ्याचदा त्याने अपेक्षांची पूर्तताही केली आणि आता कारकिर्दीच्या शेवटीही आपल्या चाहत्यांचा आणि त्यांच्या अपेक्षांचा विसर त्याला पडलेला नाही.
First published on: 31-10-2013 at 02:03 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hope to live up to the expectations of all my well wishers sachin tendulkar