भारताने गेल्या चार वर्षांत कुस्तीमध्ये नेत्रदीपक कामगिरी केली असली तरी गेल्या काही वर्षांतील आशियाई क्रीडा स्पर्धेतील कामगिरी मात्र नक्कीच दमदार झालेली नाही. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेत ही निराशा झटकून टाकून देशवासीयांची मान अभिमानाने उंचावण्यासाठी सुवर्णपदक नक्कीच पटकावेन, अशी दुर्दम्य इच्छाशक्ती भारताचा आघाडीचा मल्ल आणि भारतीय कुस्ती चमूचे सारथ्य करणाऱ्या योगेश्वर दत्तने व्यक्त केली आहे. २००६मध्ये दोहा आशियाई क्रीडा स्पर्धेत योगेश्वरने कांस्यपदक पटकावले होते, त्यानंतर २०१०मध्ये नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने सुवर्णपदकाला गवसणी घातली. २०१२ साली लंडनमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत योगेश्वरने कांस्यपदक पटकावले होते, तर नुकत्याच ग्लासगोमध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत योगेश्वरने सुवर्णपदकाची कमाई केली होती. आशियाई स्पध्रेच्या आव्हानाबाबत योगेश्वरशी केलेली बातचीत-
*काही दिवसांपूर्वी राष्ट्रकुल स्पर्धेत पटकावलेले सुवर्णपदक आशियाई स्पर्धेसाठी कितपत प्रेरणादायी ठरेल?
राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर  आत्मविश्वास उंचावला आहे, पण या स्पर्धेनंतर माझ्याकडून देशवासीयांच्या अपेक्षाही उंचावल्या असतील. त्यामुळे मेहनतीमध्ये कोणतीही कसर सोडणार नाही, पण मानसिकतेमध्ये झालेला बदल नक्कीच यशदायी ठरणार आहे.
*आशियाई स्पर्धेच्या तयारीबाबत काय सांगशील?
राष्ट्रकुलनंतर काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर आशियाई स्पर्धेसाठी मी सज्ज झालो आहे. दिवसातून ६-७ तास सराव करत आहे. त्याचबरोबर खेळाचे तंत्र अधिक विकसित आणि जलद कसे करता येईल, यावर भर देत आहे. या स्पर्धेतील प्रतिस्पध्र्याच्या खेळांचाही मी अभ्यास करत आहे.
*आशियाई स्पर्धेत तुझ्याकडून देशवासीयांनी कोणत्या पदकाची अपेक्षा करावी?
नक्कीच सुवर्ण! आतापर्यंत आशियाई स्पर्धेत मला सुवर्णपदक पटकावता आलेले नाही, पण तो सोनेरी दिनही लांब नाही. ज्या पद्धतीने माझा सराव चालला आहे, त्याचबरोबर जो पाठिंबा मला मिळत आहे ते पाहता सुवर्णपदक मी खात्रीपूर्वक जिंकेन, असा विश्वास वाटतो.
*सरकारकडून पुरेशा प्रमाणात सोयी-सुविधा मिळत आहेत का?
सरकारकडून चांगल्या सोयी-सुविधा मिळत आहे. पण अशा मोठय़ा स्पर्धामध्ये एका वेळेला तीन ठिकाणी सामने सुरू असतात, त्यामुळे सर्व ठिकाणी प्रशिक्षक असायला हवेत. सध्याच्या घडीला आमच्या चमूबरोबर दोनच प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्यामुळे सरकारने जर तीन प्रशिक्षकांना पाठवले तर नक्कीच कामगिरीत सुधारणा होईल.
*सुशील कुमारची उणीव जाणवेल का?
होय, सुशील हा अनुभवी खेळाडू आहे आणि गेल्या चार वर्षांमध्ये त्याच्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. पण त्याच्या जागी संघात आलेल्या कुस्तीपटूची गुणवत्ता पदक पटकावण्याएवढी नक्कीच आहे. तो सुशीलची उणीव काही प्रमाणात भरून काढेल.
*कुस्तीच्या चमूचे नेतृत्व तुझ्याकडे आहे, या वेळी भारताला कुस्तीमध्ये किती पदके मिळतील?
या चमूमध्ये आंतरराष्ट्रीय स्तराचा अनुभव असलेले बरेच खेळाडू आहेत. त्यांचा सरावही उत्तम पद्धतीने सुरू आहे. त्यामुळे यंदाच्या आशियाई स्पर्धेत भारताला कुस्तीमध्ये १० पदके मिळतील, असा मला विश्वास आहे.

Story img Loader