अश्वारोहण हा प्राचीन काळापासून चालत आलेला खेळ असला तरीही या खेळात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय खेळाडूंना फारसे यश मिळालेले नाही. एरवी राज्यात अनेक पर्यटन ठिकाणी घोडय़ावरून रपेट मारण्याची हौस भागविणारेही भरपूर लोक असतात. असे असूनही या खेळात महाराष्ट्राचे यश मर्यादित राहिले. या खेळात महाराष्ट्रीय खेळाडूंनी चांगले यश मिळवावे या हेतूने दिग्विजय अकादमीने अक्षरश: संघर्षांतून अश्वारोहणाच्या प्रसाराचे व्रत जोपासले आहे.
देशात विशेषत: महाराष्ट्रातील अनेक पर्यटन ठिकाणी घोडेस्वारी मोठय़ा प्रमाणावर सुरू असते. त्यास भरघोस प्रतिसाद मिळत असतो. लोकांच्या या उत्साहाचे अश्वारोहणच्या कौशल्यात रूपांतर केले तर निश्चितच या खेळातही अव्वल दर्जाचे खेळाडू घडतील व करिअर करण्याचीही संधी मिळेल या हेतूने भारलेले साधारणपणे सतरा वर्षांपूर्वी काही युवक एकत्रित आले. सुरुवातीला अश्वारोहणासाठी स्वतंत्र जागा नाही. स्वत:च्या मालकीचे अश्व नाहीत. फारसे प्रायोजक नाहीत, अनुकूल पालकांचा अभाव, अनेक टीकाकार, अशा प्रतिकूल स्थितीत त्यांनी अश्वारोहण प्रसाराचा विडा उचलला. अनेक अडचणींना तोंड देत त्यांनी गेल्या सतरा वर्षांमध्ये या खेळाची लोकप्रियता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत नेण्यात यश मिळविले आहे.
गुणेश पुरंदरे, मिलिंद काळे, विनायक हळबे, प्रदीप कुरुलकर, प्रमोद मोहिते, नितीन लाड, मकरंद पवार आदी समविचारी युवकांनी २००० मध्ये अश्वारोहण प्रशिक्षण देण्याच्या कार्यास सुरुवात केली. पहिली दोन-तीन वर्षे त्यांना चांगली जागा मिळविताना खूपच संघर्ष करावा लागला. घोडे भाडय़ाने घेणे व त्यांची निगा राखणे ही काही सोपी गोष्ट नव्हती. तरीही पदरमोड करीतच या संघटकांनी दिवाळी व उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रशिक्षण देण्याचा उपक्रम सुरू केला. त्यांच्या या उपक्रमासाठी चंद्रकांत चौधरी यांच्याकडून पहाटे घोडे घेऊन मयूर काल कॉलनीतील राणी लक्ष्मीबाई शाळेत आणायचे व त्या घोडय़ांवर मुलांना शिकवायचे असे अनेक महिने अश्वारोहणाचे शिबीर सुरू होते. या मंडळींचा उत्साह पाहून या शाळेजवळ राहणाऱ्या तुळपुळे कुटुंबीयांनी त्यांना दोन-तीन घोडे दिले. २००२ मध्ये या शिबिरातून तयार झालेल्या काही खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेतही भाग घेतला. अर्थात परगावच्या स्पर्धेत भाग घ्यावयाचा म्हणजे एक तर घोडे तेथे न्यायचे किंवा स्पर्धेच्या ठिकाणी भाडेतत्त्वावर घोडे घेणे म्हणजे मोठे खर्चीक काम असायचे. तसेच स्पर्धेपूर्वी स्पर्धेच्या ठिकाणी सराव करणे ही आणखीनच अवघड कामगिरी असायची.
अधिकाधिक स्पर्धामध्ये भाग घेण्याची संधी मिळाली तरच त्यामध्ये खेळाडू हिरिरीने भाग घेतात. हे लक्षात आल्यानंतर स्थानिक स्तरावरही स्पर्धा आयोजित केली पाहिजे असे दिग्विजय अकादमीच्या संघटकांना वाटू लागले. काही वेळा स्वत:ची पदरमोड करीत व पालकांच्या साहाय्यानेच सुरुवातीला काही स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. भारतीय अश्वारोहण महासंघ व महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान यांचेही त्यांना मोठे सहकार्य लाभल्यामुळे गेली दहा वर्षे राज्य स्तरावर स्पर्धा यशस्वीरीत्या आयोजित केली जात आहे. पहिल्या वर्षी स्पर्धेत पन्नासहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. ही संख्या आता तीनशेहून जास्त स्पर्धकांपर्यंत पोहोचली आहे. ही अश्वारोहण प्रसाराचीच पावती आहे. ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय पंच कर्नल सरप्रतापसिंह, कर्नल वाय.डी. सहस्रबुद्धे आदी अनुभवी संघटकांची या स्पर्धेसाठी तांत्रिकदृष्टय़ा भरपूर मदत होत असते.
खेळात काही नावीन्य असेल तर खेळाडूंप्रमाणेच प्रायोजकही उत्साह दाखवितात. हा हेतू लक्षात घेऊनच अश्वारोहणात शो जंपिंग, ड्रेसेज, टेंट पेकिंग या मुख्य प्रकारांबरोबरच जिमखाना प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये घोडय़ावरूनच जिलेबी घेणे, गवतात बूट शोधणे व चेंडू बादलीत टाकणे आदी आकर्षक क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. त्यामुळे खेळातील रंगत वाढण्यास मदत झाली आहे.
महाराष्ट्रात गडचिरोली, चंद्रपूर, बुलढाणा, रत्नागिरी आदी अनेक भागांमध्येही अश्वारोहणाच्या प्रसाराचा वसा दिग्विजयच्या संघटकांनी यशस्वीपणे पूर्ण केला आहे. अश्वारोहणात भाग घेणाऱ्या खेळाडूंना ज्याप्रमाणे शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती आवश्यक असते त्याप्रमाणे घोडय़ांचीही मानसिकता महत्त्वाची असते. अनेक घोडय़ांचे स्वभाव लहरी असू शकतात. स्पर्धेसाठी घोडय़ांना तयार करण्याचे आव्हान या संघटकांना पाहावे लागते. अनेक शिबिरे व स्पर्धाच्या सरावांमुळे या संघटकांना कालांतराने त्याचाही अभ्यास झाला आहे. अनेक ठिकाणी अश्वारोहणाकरिता घोडे खरेदी करताना अनेक जण या संघटकांची मदत घेत असतात. अश्वारोहणातही करिअर करता येते हेही या संघटकांनी दाखवून दिले आहे. त्यांच्या सराव शिबिरातून तयार झालेल्या तीन-चार खेळाडूंना इंग्लंड, इंडोनेशिया आदी देशांमधील अश्वारोहण अकादमीत साहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम करण्याची संधीही मिळाली आहे.
स्पर्धाबरोबर ऐतिहासिक ठिकाणी अश्वारोहण मोहिमांचे नियमित आयोजन करण्याचाही उपक्रम त्यांनी सुरू ठेवला आहे. या उपक्रमांमुळेही अश्वारोहण खेळाच्या प्रसारास चालना मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अश्वारोहणाच्या स्पर्धा आयोजित करण्याचे स्वप्न या संघटकांनी पाहिले आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी ते आता प्रयत्न करीत आहेत.