यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन पाकिस्तानकडे होतं. भारतीय संघाने पाकिस्तानात जायला नकार दिला. भारतीय संघाचे सामने दुबईत खेळवण्यात आले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सत्ताकेंद्र असलेल्या बीसीसीआयची ताकद पुरस्कार सोहळ्यात दिसून आली. अंतिम सामना भारतीय संघाने जिंकल्यानंतर काही वेळातच पुरस्कार सोहळा सुरू झाला. मात्र आयोजक असलेल्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या एकाही पदाधिकाऱ्यांना व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलं नाही. पाकिस्तानच्या संघाला प्राथमिक फेरीतूनच गाशा गुंडाळावा लागला. भारतीय संघाने अंतिम फेरीत धडक मारल्याने अंतिम लढत दुबईत झाली. तिथेही पाकिस्तानची निराशा झाली. पुरस्कार सोहळ्यात याची पुनरावृत्ती पाहायला मिळाली.
पुरस्कार वितरण सोहळ्याला आयसीसीचे चेअरमन जय शहा, बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी, बीसीसीआयचे सचिव देवजीत साईकिया आणि न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू आणि न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचे संचालक रॉजर टूस उपस्थित होते. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांपैकी एकालाही व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आले नाही. पुरस्कार सोहळ्यात अंतिम लढतीत काम पाहिलेले पंच पॉल रायफेल, रे इलिंगवर्थ, जोएल विल्सन, कुमार धर्मसेना तसंच सामनाधिकारी रंजन मदुगले यांना सन्मानित करण्यात आलं. उपविजेता संघ न्यूझीलंडच्या खेळाडूंना गौरवण्यात आलं. यानंतर भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूचा सन्मान करण्यात आला.
पाकिस्तानला आयोजक मिळाल्यानंतरही सुरक्षेच्या मुद्यावरून बाकी संघ तिथे जाणार का याविषयी साशंकता होती. पाकिस्तानमध्ये लाहोर, कराची आणि रावळपिंडी येथे मैदानांचं नूतनीकरण करण्यात आलं. ही मैदानं निर्धारित वेळेत तयार होणार का याबद्दल बरीच उलटसुलट चर्चा झाली. मात्र अखेर पाकिस्तानमध्येच स्पर्धेचं आयोजन होईल हे स्पष्ट झालं. पण सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघाने पाकिस्तानला जाण्यास नकार दिला. भारतीय संघाचे सामने कुठे होणार यावरून महिनाभर तिढ्याची परिस्थिती होती. अखेर भारताचे सामने दुबईत होणार हे स्पष्ट झालं.
भारताचे सामने दुबईत असल्यामुळे भारताच्या गटातील तसंच भारताविरुद्ध सामने होणाऱ्या संघाना पाकिस्तान ते दुबई असा प्रवास करावा लागेल हेही स्पष्ट झालं. पाकिस्तानमध्ये स्पर्धेचे १० सामने खेळवण्यात आले. दुबईत ५ सामने खेळवण्यात आले. तांत्रिकदृष्ट्या पाकिस्तान आयोजक असूनही पुरस्कार सोहळ्यात त्यांना दूर ठेवण्यात आलं. भारतीय संघाने पाकिस्तानात येण्यास नकार दिल्याने चाहते नाराज झाले होते. भारतीय संघामुळे बाकी संघांची फरपट झाली अशी टीका असंख्य आजी- माजी खेळाडूंनी केली.
भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहत जेतेपदावर नाव कोरलं. बांगलादेश, पाकिस्तान, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि पुन्हा एकदा न्यूझीलंडला हरवत भारतीय संघाने दणदणीत वर्चस्व गाजवलं.