अन्वय सावंत, लोकसत्ता
मुंबई : बुद्धिबळ ऑलिम्पियाड या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याचा मान मिळणे, हे भारतासाठी खूप मोठे यश आहे. या स्पर्धेमार्फत भारतातील युवकांना जगभरातील आघाडीच्या बुद्धिबळपटूंचा खेळ जवळून पाहण्याची संधी मिळेल. त्यामुळे त्यांनाही भविष्यात बुद्धिबळपटू म्हणून कारकीर्द घडवण्याची प्रेरणा मिळू शकेल, असे मत भारताचा तारांकित बुद्धिबळपटू विदित गुजराथीने व्यक्त केले.
यंदा भारताला प्रथमच बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या आयोजनाची संधी लाभली असून स्पर्धा २८ जुलै ते १० ऑगस्ट या कालावधीत चेन्नईजवळील महाबलीपुरम येथे होणार आहे. ‘‘२००२मध्ये भारताने ‘फिडे’ विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेचे यजमानपद भूषवले होते. हैदराबाद येथे झालेल्या या स्पर्धेचे सामने मी पाहिले होते आणि त्यावेळी विश्वनाथन आनंदचा खेळ पाहून मलाही बुद्धिबळ खेळण्याची प्रेरणा मिळाली होती. आता ऑलिम्पियाड स्पर्धेत जगभरातील आघाडीचे बुद्धिबळपटू सहभागी होतील. त्यांचा खेळ युवकांसाठी प्रेरणादायी ठरू शकेल. बुद्धिबळाच्या विकासासाठी सध्या भारतात पोषक परिस्थिती आहे. जागतिक बुद्धिबळातील सर्वोत्तम देशांमध्ये आता भारताची गणना केली जाते. ऑलिम्पियाड स्पर्धेमुळे भारतीय बुद्धिबळाच्या प्रगतीचा वेग अधिक वाढेल याची मला खात्री आहे,’’ असे २७ वर्षीय विदित म्हणाला.
भारताला ऑलिम्पियाडमध्ये खुल्या विभागात तीन आणि महिला विभागात दोन असे एकूण पाच संघ खेळवण्याची संधी मिळणार आहे. जागतिक क्रमवारीत २६व्या स्थानी असलेल्या विदितचा खुल्या विभागातील भारताच्या ‘अ’ संघात समावेश असून तो पहिल्या पटावरील सामने खेळेल. त्यामुळे त्याच्यासमोर प्रतिस्पर्धी संघांतील सर्वोत्तम खेळाडूचे आव्हान असेल. मात्र, या जबाबदारीसाठी तो सज्ज आहे.
‘‘माझ्या नेतृत्वाखाली भारताने २०२०च्या ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद मिळवले होते. त्यावेळी ही स्पर्धा प्रथमच ऑनलाइन स्वरूपात झाली होती. त्यामुळे मला खेळाडू म्हणून सर्वोत्तम कामगिरी करतानाच काही प्रशासकीय निर्णयही घ्यावे लागले होते. मात्र, मला याचे दडपण जाणवले नव्हते. अतिरिक्त जबाबदारीमुळे माझा खेळ अधिक बहरतो, अशी माझी धारणा आहे. देशाचे प्रतिनिधित्व करताना सर्वोत्तम कामगिरी करण्याची मला प्रेरणा मिळते,’’ असेही विदितने नमूद केले.
जेतेपदासाठी भारत प्रबळ दावेदार!
बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये यजमान या नात्याने पाच संघ खेळवण्याची संधी मिळणे भारतासाठी फायदेशीर ठरू शकेल, असे विदितला वाटते. ‘‘आपल्याकडे प्रतिभावान बुद्धिबळपटूंची मोठी संख्या आहे. खुल्या विभागातील तिन्ही भारतीय संघांमध्ये केवळ ग्रँडमास्टर खेळाडूंचा समावेश असून जवळपास सर्वाचे २६००हून अधिक एलो गुण आहेत. त्यामुळे या विभागात अमेरिकेसह भारताला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. महिलांमध्ये भारताच्या ‘अ’ संघाला अव्वल मानांकन लाभले आहे. भारताच्या संघाला अग्रमानांकन मिळाल्याची ही पहिलीच वेळ असेल. त्यामुळे या विभागातही आपल्याला यशस्वी कामगिरीची अपेक्षा आहे,’’ असे विदितने सांगितले.