अन्वय सावंत, लोकसत्ता

मुंबई : यंदा पहिल्यांदा ‘फिडे’ ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी लाभणे ही भारतासाठी अभिमानाची बाब आहे. ऑलिम्पियाडच्या यजमानपदामुळे भारतीय बुद्धिबळाने गेल्या दोन-तीन वर्षांत केलेली प्रगती अधोरेखित होते, असे मत अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे (एआयसीएफ) सचिव भरत सिंह चौहान यांनी व्यक्त केले.

यंदा ४४वी ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धा २८ जुलै ते १० ऑगस्ट या कालावधीत चेन्नई येथे होणार आहे. ‘‘या स्पर्धेत जगभरातील आघाडीचे बुद्धिबळपटू सहभागी होतील. अनुभवी खेळाडू स्वत:चे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध करण्याचा प्रयत्न करतील, तर चाहत्यांना भविष्यातील ताऱ्यांचीही झलक पाहायला मिळेल. गेल्या काही वर्षांत भारतीय बुद्धिबळाने झपाटय़ाने प्रगती केली आहे. आता ऑलिम्पियाड स्पर्धेच्या माध्यमातून भारताला आपली स्पर्धा आयोजनाची क्षमता, खेळाडूंची गुणवत्ता दाखवण्याची संधी मिळेल,’’ असे चौहान म्हणाले.

यंदाची ऑलिम्पियाड स्पर्धा आधी रशिया येथे खेळवली जाणार होती. मात्र, युक्रेनवर केलेल्या हल्ल्यांनंतर रशियाकडून यजमानपदाचे हक्क काढून घेण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने (फिडे) घेतला. त्यानंतर भारताने त्वरित या स्पर्धेच्या यजमानपदासाठी दावेदारी केली. ‘‘रशिया-युक्रेन संघर्षांला सुरुवात झाल्यानंतर आम्ही ‘फिडे’चे अध्यक्ष अर्कादी द्वोर्कोव्हिच यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळीच आम्हाला यजमानपदाची संधी लाभू शकेल याचे संकेत मिळाले. त्यानंतर तमिळनाडू सरकारने आम्हाला निधी उपलब्ध करून दिला. आमच्याकडे योजना तयार होती. त्यामुळे भारत या स्पर्धेचे यजमानपद यशस्वीरीत्या भूषवेल असा विश्वास ‘फिडे’ला वाटला,’’ असेही चौहान यांनी सांगितले.

Story img Loader