राजस्थान रॉयल्सच्या आयपीएल सामन्यासाठी निवासव्यवस्था असलेल्या मोहालीमधील फाइव्ह स्टार हॉटेलच्या सीसीटीव्ही चित्रणातून धक्कादायक माहिती पुढे येत आहे. एस. श्रीशांत आणि अंकित चव्हाण यांनी रात्री सट्टेबाज जिजू जनार्दनची भेट घेतली. या भेटीत काही पाकिटेसुद्धा या खेळाडूंना देण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. याचप्रमाणे दोन तरुणी निरनिराळ्या वेळेला या ठिकाणी आल्याचे निष्पन्न होत आहे.
राजस्थान रॉयल्सने ९ मे रोजी दुपारी झालेल्या आयपीएल सामन्यात किंग्ज ईलेव्हन पंजाबचा पराभव केला. त्यानंतर रात्री नऊ वाजण्यापूर्वीच संपूर्ण संघ हॉटेलमध्ये परतला. त्या रात्री स्वत:च्या खोलीबाहेर हॉटेलच्या कॉरिडोरमध्ये एस. श्रीशांत आणि अंकित चव्हाण यांनी जागून जी कृत्ये केली, त्याचे चित्रण दिल्ली पोलिसांकडे उपलब्ध आहे.
रविवारी काही वृत्तवाहिन्यांनी हे चित्रण प्रसारित करीत स्पॉट-फिक्सिंग प्रकरणाचा पर्दाफाश केला.
रात्री सव्वादहा ते पहाटेपर्यंत हे खेळाडू आपल्या खोलीबाहेर वावरताना आढळून आले. जनार्दनने चव्हाण आणि श्रीशांतची भेट घेऊन पाकिटांचे आदान-प्रदान केले. यावेळी काळ्या पोशाखातील एक तरुणीसुद्धा तिथे होती, असे स्पष्ट होत आहे.
मग रात्री ११ वाजच्या सुमारास चव्हाण, श्रीशांत आणि ती तरुणी तेथून निघून गेले. त्यानंतर तीन तासांनी श्रीशांत परतला, तेव्हा त्याच्यासमवेत दुसरी तरुणी होती. हे दोन खेळाडू मग तिच्यासमवेत खोलीत गेले आणि पहाटे बाहेर आले.
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याच फाइव्ह स्टार हॉटेलच्या परिसरात असलेल्या आणखी एका हॉटेलमधील दोन सट्टेबाजांच्या संशयास्पद हालचालींवर पोलिसांची नजर आहे. त्यांनी ९ आणि १० मे रोजी या हॉटेलमध्ये निवास केल्याचे सिद्ध झाले आहे. या हॉटेलच्या सीसीटीव्ही चित्रणाची पोलीस पाहणी करीत आहेत.

Story img Loader