यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतचा फलंदाजी आणि यष्टीरक्षणातला खराब फॉर्म हा गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय संघासाठी चिंतेचा विषय बनला आहे. २०१९ विश्वचषकात भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर भारतीय निवड समितीने धोनीला विश्रांती देत, पंतला संघात संधी दिली. इतकच नाही, तर यापुढील सर्व मालिका आणि टी-२० विश्वचषकासाठी ऋषभ पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक असेल असंही जाहीर केलं. मात्र पंतला मिळालेल्या संधीचा फायदा उचलता आला नाही, काही ठराविक अपवाद वगळता सर्व सामन्यांत ऋषभची निराशाजनक कामगिरी सुरुच राहिली आहे. मात्र अशा परिस्थितीतही संघाचा सलामीवीर रोहितने ऋषभची पाठराखण केली आहे.

“मी काही दिवसांपूर्वी ऋषभ पंतशी बोलत होतो. तो बिचारा आता २१-२२ वर्षांचा आहे, तरीही त्याने प्रत्येक सामन्यात शतक झळकावं अशी लोकांची अपेक्षा असते. तू असं कर, तू तसं कर असं प्रत्येक जण त्याला सांगत असतो. हा फालतुपणा थांबायला हवा. मी त्याला सांगितली की तू स्वतःभोवती एक वलय निर्माण कर की ज्यामध्ये कोणत्याही नकारात्मक गोष्टी येणार नाहीत. लोकं तुझ्याबद्दल बोलत राहतील, त्यांना बाहेर बोलत राहू दे…तू त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस. तुला जे योग्य वाटतंय तेच तू कर. कोणास ठावूक हा सल्ला त्याच्या कामाला येईल, मला स्वतःला याचा फायदा झाला होता.” रोहित पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

यादरम्यान, रोहितने आपल्या संघातील तरुण खेळाडूंचं कौतुकही केलं. “लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, शिवम दुबे हे खेळाडू एकाच वेळी संघात एकत्र खेळले नाहीयेत. ज्यावेळी त्यांच्यावर जबाबदारी येईल त्यावेळी त्यांच्या खेळात आत्मविश्वास येईल. गोष्टी आता बदलत आहेत. श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर चांगली कामगिरी करतो आहे. विंडीजविरुद्ध वन-डे मालिकेतही ऋषभने चांगली कामगिरी केली. श्रेयसला आता माहिती झालंय की तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणार आहे. तो आता आपल्या ठरलेल्या रणनितीसारखा खेळू शकतो. इतरांनाही अगोदर संघातली आपली जागा पक्की करावी लागेल.” ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे मालिकेतून रोहित भारतीय संघात पुनरागमन करेल.

अवश्य वाचा – चौथ्या क्रमांकाची जागा श्रेयसचीच ! रोहित शर्माकडून मुंबईकर साथीदाराचं कौतुक

Story img Loader