Ravichandran Ashwin, WTC Final 2023: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) अंतिम सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०९ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापनालाही सतत टीकेला सामोरे जावे लागत आहे. रविचंद्रन अश्विनला प्लेइंग ११मध्ये स्थान न मिळाल्याने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले. कारण कांगारू संघात अनेक डावखुरे फलंदाज उपस्थित होते. त्याचवेळी भारतीय महिला संघाची माजी कर्णधार अंजुम चोप्रानेही या निर्णयावर आश्चर्य व्यक्त करताना संघ व्यवस्थापनावर टीका केली आहे.
अंजुम चोप्राने न्यूज१८ ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “मला खूप वाईट वाटले, मी जर कर्णधार असते तर रविचंद्रन अश्विनला माझ्या संघातून बाहेर काढण्याचा किंवा ठेवण्याचा मूर्खपणा मी कधीच केला नसता. मला असे म्हणत नाही येणार की आम्ही ४ वेगवान गोलंदाजांसोबत खेळू शकत नाही. पण मला वाटते की परिस्थिती कशीही असो, अश्विनचा संघात नक्कीच समावेश केला असता.”
भारतीय महिला संघाची माजी कर्णधार चोप्रा पुढे म्हणाली, “जर भारताने नाणेफेक गमावली असती आणि आम्हाला प्रथम फलंदाजी करण्यास सांगितले असते तर मी वेगळा विचार केला असता पण अश्विनला बाहेर नसते ठेवले. प्रथम फलंदाजीला आपण घाबरलो होतो का? असा विचार करून आपल्याला त्रास होतो. एवढे दिग्गज फलंदाज असताना नकारत्मक विचार करणेच चुकीचे होते. मला खात्री आहे की संघ व्यवस्थापनाने या निर्णयाचा थोडा विचार केला असेल.”
अंजुम चोप्रा टीम इंडियाच्या निर्णयावर टीका केली. ती पुढे म्हणाली की, “अश्विन एक महान गोलंदाज आहे आणि मी त्याला माझ्या प्लेइंग ११ मध्ये नक्कीच समाविष्ट करेन. तो कोणत्याही परिस्थितीत संघासाठी चांगली कामगिरी करू शकतो. त्याची मागील उत्कृष्ट कामगिरी आणि कौशल्य बघा, संघ व्यवस्थापनाने त्याला प्लेइंग ११ मध्ये नक्कीच समाविष्ट करायला हवे होते.”
अश्विननेही समावेश न झाल्याबद्दल निराशा व्यक्त केली
डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यानंतर, रविचंद्रन अश्विनने एका मुलाखतीदरम्यान प्लेइंग ११ मध्ये स्थान न मिळाल्याने आपली निराशा व्यक्त केली. अश्विन म्हणाला होता की, “इथपर्यंत पोहोचण्यात मीही माझी भूमिका बजावली आहे. गेल्या वेळी मी अंतिम सामन्यात ४ विकेट्स घेतल्या होत्या. २०१८-१९ या वर्षापासून माझी गोलंदाजी परदेश दौऱ्यांवर चांगली झाली आहे.” पुढे अश्विन म्हणाला की, “असे अनेकवेळा घडले आहे जेव्हा संघाच्या कर्णधाराची भूमिका त्याच्यासमोर आली आहे आणि त्याच्या विरोधात बरेच काही बोलले गेले आहे.”