India Qualification scenarios explained for WTC Final: भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील चौथा कसोटी सामना मेलबर्न येथे खेळवला जात आहे. ही कसोटी मालिका भारतासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठण्यासाठी मोठी संधी असणार आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला मेलबर्न कसोटी सामना कोणत्याही किंमतीत जिंकावा लागेल. मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. सध्या भारतीय संघ WTC गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. अशातच जर मेलबर्न कसोटी सामना अनिर्णित राहिला किंवा भारताचा पराभव झाला, तर भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी मिळेल का? जाणून घेऊया समीकरण.
मेलबर्न कसोटी भारताने गमावली तर काय होईल?
मेलबर्न कसोटीत जर भारतीय संघ पराभूत झाला तर टीम इंडिया मालिकेत १-२ ने पिछाडीवर जाईल, यानंतर अखेरचा कसोटी सामना सिडनीमध्ये खेळवला जाईल. पण चौथ्या कसोटीत पराभव झाला तर भारत WTC फायनलसाठी पात्र ठरण्याची शक्यता बरीच कमी होईल. भारताची टक्केवारी ५५.८८ वरून ५२.७८ वर येईल. तर ऑस्ट्रेलियाची टक्केवारी ५८.८९ वरून ६१.४५ पर्यंत वाढ होईल, ज्यामुळे WTC गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाचे स्थान आणखी मजबूत होईल.
WTC क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेला भारत मेलबर्नमधील पराभवानंतरही त्याच स्थानावर राहील. मात्र, अशा स्थितीत अंतिम फेरी गाठण्याच्या शक्यतेला मोठा फटका बसणार आहे. WTC अंतिम फेरीच्या शर्यतीत टिकण्यासाठी भारताला सिडनीतील अंतिम कसोटी जिंकावी लागेल आणि इतर संघांच्या निकालांवर अवलंबून राहावे लागेल.
WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारतासाठी कसं आहे संपूर्ण समीकरण?
१. जर भारताने पाच सामन्यांची कसोटी मालिका ३-१ ने जिंकली तर भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी थेट पात्र ठरेल.
२. जर भारताने ही कसोटी मालिका २-१ ने जिंकली तर श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाविरूद्ध १ कसोटी सामना ड्रॉ खेळावा लागेल किंवा पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करावं अशी प्रार्थना भारताला करावी लागेल.
३. जर भारत आणि ऑस्ट्रेलियामधील ही कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत राहिली तर श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं पाहिजे आणि पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा मालिकेत २-० ने पराभव केला पाहिजे अशी प्रार्थना टीम इंडिया करेल.
४. जर ही कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत राहिली तर श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाने १-०ने पराभूत करावं आणि पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा मालिकेत २-० ने पराभव केला पाहिजे असं समीकरण भारतासाठी असेल.
५. जर भारताने भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका गमावली तर भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या शर्यतीतून बाहेर पडेल.