How Can India Qualify for WTC Final If They Lose 2nd Test to New Zealand: न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाची स्थिती खूपच वाईट असल्याचे दिसत आहे. या सामन्यात दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत किवी संघाने दुसऱ्या डावात फलंदाजी करताना ५ बाद १९८ धावा केल्या असून या संघाची एकूण आघाडी ३०१ धावांची झाली आहे. तर अजूनही ५ विकेट्सही शिल्लक आहेत. या सामन्याच्या पहिल्या डावात किवी संघाने २५९ धावा केल्या होत्या आणि प्रत्युत्तरात भारतीय संघ १५६ धावांवर बाद झाला होता. आता किवी संघाने इतकी भक्कम आघाडी मिळवली आहे की सामन्यात पुनरागमन करणे भारतासाठी कठीण दिसत आहे. भारताला सलग दुसरा पराभव पत्करावा लागला तर गुणतालिकेत भारताला मोठा धक्का बसणार आहे.
या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला किवी संघाकडून पराभव पत्करावा लागला होता आणि दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा विजय होण्याची शक्यता कमीच दिसत आहे. जर भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्धचा सलग दुसरा कसोटी सामना जिंकण्यात अपयशी ठरला तर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत कसा पोहोचेल, याचे समीकरण काय असेल हे सविस्तर जाणून घेऊया. भारतीय संघाने जर सलग दुसरा कसोटी सामना गमावला तर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फेरीत जाण्यासाठी संघाचा मार्ग खडतर होणार आहे.
भारत पुणे कसोटीत पराभूत झाला तर कसं असणार WTC फायनलचं समीकरण?
भारत सध्या १२ सामन्यांनंतर ६८.०६ टक्के गुणांसह जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. ऑस्ट्रेलिया ६२.५० टक्क्यांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर श्रीलंका ५५.५६ टक्क्यांसह दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी, WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारत मजबूत स्थितीत दिसत होता. मात्र, बंगळुरूतील निराशाजनक पराभवानंतर अंतिम फेरीचा मार्ग थोडा आव्हानात्मक बनला असून पुण्यात आणखी एक पराभवाचा धक्का बसण्याची शक्यता आहे. जर भारताला न्यूझीलंडविरुद्ध सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले तर त्यांची टक्केवारी ६२.८२ वर घसरेल. जे ऑस्ट्रेलियाच्या टक्केवारीच्या फारच जवळ आहे. जर भारताने आपली कामगिरी सुधारली नाहीतर त्यांना गुणतालिकेतील पहिले स्थान गमवावे लागेल.
भारताने जर न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा सामना गमावला तर भारताला इतर संघांच्या समीकरणावर अवलंबून न राहता प्रथम पुढील ६ कसोटी सामन्यांपैकी ४ सामने संघाला जिंकावे लागतील तर एक सामना ड्रॉ करावा लागेल. पुणे कसोटीनंतर भारताला किवी संघाविरुद्ध एक कसोटी आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ कसोटी सामने खेळायचे आहेत. अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला न्यूझीलंडविरुद्धचा तिसरा कसोटी सामना जिंकावा लागेल आणि बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाचा ३-२ असा पराभवही करावा लागेल. तसे झाले नाही तर भारताला अंतिम फेरी गाठणे कठीण होऊ शकते.
भारतीय संघ जर पुढील ६ सामन्यात ४ सामने जिंकण्यात अपयशी ठरला तर इतर संघांच्या मालिकेतील अनुकूल निकालांवर अवलंबून राहावे लागेल. उदाहरणार्थ, या WTC सायकलमध्ये श्रीलंका ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्याविरूद्ध खेळणार आहे आणि त्या निकालांचा थेट परिणाम भारताच्या सलग WTC अंतिम फेरीत पोहोचण्याच्या शक्यतांवर होईल.