Champions Trophy Pakistan Semi Final Scenario After Defeat against New Zealand: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा गतविजेता आणि यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा यजमान संघ पाकिस्तानची सुरूवात स्पर्धेत फारच खराब झाली. या आयसीसी स्पर्धेतील सलामीचा सामना कराचीत पाकिस्तान वि. न्यूझीलंड यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात पाकिस्तानची अत्यंत खराब कामगिरी पाहायला मिळाली, ज्यामुळे पाकिस्तानला ६० धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवामुळे यजमान संघाला उपांत्य फेरी गाठणे कठीण झाले आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीचा उल्लेख मिनी वर्ल्डकप असा केला जातो. वनडे फॉरमॅटमध्ये खेळवल्या जाणाऱ्या या स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर प्रत्येक सामना जिंकणं आणि उपांत्य फेरी गाठणं हे फार महत्त्वाचं असत. पण आता पाकिस्तानने पहिलाच सामना गमावल्याने त्यांच्यावर स्पर्धेतून बाहेर होण्याची वेळ आली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सेमीफायनलसाठी पाकिस्तान पराभवानंतर कसा पात्र ठरू शकतो?
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ही स्पर्धा ८ संघांमध्ये खेळवली जात आहे. पाकिस्तानचा संघ भारत, न्यूझीलंड आणि बांगलादेशसह अ गटात आहे. तर या गटातील प्रत्येक संघाविरूद्ध १-१ सामना खेळायचा आहे. म्हणजेच त्याचे आता गट टप्प्यात पाकिस्तानचे अजून २ सामने बाकी आहेत. पाकिस्तानचा पुढील सामना २३ फेब्रुवारीला भारताविरुद्ध असून त्यानंतर त्यांचा सामना बांगलादेशशी होणार आहे.
जर पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठायची असेल, तर हे दोन्ही सामने त्यांच्यासाठी करो किंवा मरो असतील. यजमान पाकिस्तानला दोन्ही सामने कोणत्याही किंमतीत जिंकावे लागतील आणि नेट रन रेटही सुधारावा लागेल.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कोणत्याही संघाला उपांत्य फेरीत थेट प्रवेश मिळवण्यासाठी ३ पैकी किमान २ सामने जिंकावे लागतात. त्यामुळे पाकिस्तानच्या संघाने या दोन सामन्यांपैकी एकही सामना गमावला तर ते स्पर्धेबाहेर पडतील. पाकिस्तान आणि भारत यांच्यातील लढतीत कायमच भारत वरचढ राहिला आहे. तर दुसरी गोष्ट म्हणजे भारत-पाकिस्तानमधील सामना हा दुबईमध्ये खेळवला जाणार आहे.
गट सामन्यात पाकिस्तानने फक्त एकच सामना जिंकला तर इतर संघांच्या निकालावरही त्यांना अवलंबून राहावे लागेल. या स्थितीत, त्याच्या गटातील एक संघ आपले सर्व ३ सामने जिंकेल आणि इतर दोन संघ प्रत्येकी १ सामना जिंकतील अशी आशा करावी लागेल. अशा स्थितीत पाकिस्तान संघ रनरेटच्या आधारे उपांत्य फेरी गाठण्याचा दावेदार असेल.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना २३ फेब्रुवारीला रविवारी दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर होणार आहे. या मैदानावर भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये आतापर्यंत २ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. मात्र या दोन्ही सामन्यांत पाकिस्तान संघाला पराभवाचा सामना करावा लागला. म्हणजेच त्यांना उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवायच्या असतील तर या वेळी त्यांना मोठं काहीतरी करावं लागणार आहे, जे त्यांच्यासाठी अजिबात सोपं असणार नाही.