६६ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता आणि चांदीच्या गदेचा मानकरी ठरलेला मल्ल म्हणजे सिकंदर शेख. गतविजेत्या शिवराज राक्षेवर त्याने अवघ्या २२ सेकंदांत विजय मिळवला. सिकंदरचं पारडं सुरुवातीपासूनच जड होतं. मात्र शिवराज राक्षे त्याला आव्हान उभं करेल असं वाटलं होतं. तसं मात्र घडलं नाही.
काय घडलं २२ सेकंदात?
अंतिम फेरीची लढत सुरु झाली. शिवराज राक्षे आणि सिकंदर शेख यांनी एकमेकांना आव्हान देण्यास सुरुवात केली. सुरुवात झाल्यापासूनच सिकंदर आक्रमक वेगाने खेळत होता. सिकंदरच्या वेगापुढे शिवराजचा निभाव लागला नाही. कारण २२ व्या सेकंदाला सिकंदरने झोळी डाव घेत शिवराजला धोबीपछाड केलं. चितपट करुन विजय मिळवला. कुस्तीचे हे २२ सेकंद उपस्थितांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारे ठरले.
सिकंदरने झोळी डाव खेळला आणि..
कुस्तीची पंढरी मानली जाणाऱ्या कोल्हापुरातल्या गंगावेश तालमीत मेहनत घेणाऱ्या सिंकदर शेखने अवघ्या २२ सेकंदात ६६ व्या महाराष्ट्र केसरीचा किताब पटकवला.अंतिम फेरीच्या लढतीत सिकंदर शेखने प्रतिस्पर्धी शिवराज राक्षेला २२ व्या सेकंदाला झोळी डावावर चितपट केले. माती विभागातून संदीप मोटेचा पराभव करुन सिकंदर शेखने अंतिम फेरी गाठली होती. तर गादी विभागातून हर्षद कोकाटेला पराभवाची धूळ चारत शिवराज राक्षे दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत धडकला होता. या दोघांमधली लढत अत्यंत चुरशीची झाली. या लढतीत शिवराज राक्षेचा पराभव करत सिकंदर शेखने मैदान मारलं आणि महाराष्ट्र केसरीच्या गदेवर आपलं नाव कोरलं.
प्रदीप कंद, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि भारतीय कुस्ती महासंघ तसेच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने ६६ वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा फुलगाव येथील सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेमध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
पारितोषिक वितरणप्रसंगी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, मुरलीधर मोहोळ, स्वागताध्यक्ष प्रदीप कंद, कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे, विलास कथुरे,योगेश दोडके यावेळी उपस्थित होते. विजेत्या सिकंदरला थार गाडी, मानाची गदा असे पारितोषिक देण्यात आले. उपविजेता शिवराज ट्रॅक्टरचा मानकरी ठरला.