India vs Australia, U19 World Cup Final : दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आलेल्या यंदाच्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ७९ धावांनी धुव्वा उडवला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांमध्ये ७ बाद २५३ धावा करत भारतासमोर २५४ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ सपशेल अपयशी ठरला. भारताचा युवा संघ निर्धारित ५० षटकंदेखील खेळू शकला नाही. टीम इंडियाला ४३.५ षटकांत अवघ्या १७४ धावांपर्यंत मजल मारता आली. सलामीवीर आदर्श सिंह (४७) आणि खालच्या फळीत मुरुगन अभिषेक (४२) या दोघांनी काही काळ प्रतिकार केला खरा, परंतु, या दोघांना दुसऱ्या कुठल्याच फलंदाजाकडून साथ मिळाली नाही. त्यामुळे भारताला या सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या सामन्यात आदर्श सिंग आणि मुरुगन अभिषेकव्यतिरिक्त इतर कुठल्याही भारतीय फलंदाजाला खेळपट्टीवर टिकता आलं नाही. संघातील ७ खेळाडू दुहेरी धावसंख्यादेखील गाठू शकले नाहीत. अर्शीन कुलकर्णी (३), कर्णधार उदय सहारन (८), मुशीर खान (२२), सचिन धस (९), प्रियांशू मोलिया (९), अरवली अविनाश राव (०), राज लिंबानी (०), सौमी कुमार (२) हे खेळाडू सपशेळ अपयशी ठरले. तर नमन तिवारी ११ धावांवर नाबाद राहिला.

U19 WC Final : “आमची तयारी चांगली होती, पण..”, पराभवानंतर कर्णधार उदय सहारनची प्रतिक्रिया

दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीत वैविध्य पाहायला मिळालं. कर्णधार ह्यू वैबगेनने सर्व गोलंदाजांचा पुरेपूर वापर केला. प्रत्येक गोलदांजाकडून योग्य वेळी हव्या त्या पद्धतीने गोलंदाजी करून घेतली. परिणामी कुठल्याच भारतीय फलंदाजाला डोकं वर काढण्याची संधी मिळाली नाही. ऑस्ट्रेलियाकडून राफेल मॅकमिलन याने ३, मह्ली बीअर्डमनने ३ आणि कॉलम विडलरने २ बळी टीपले. तर, चार्ली अँडरसन आणि टॉम स्ट्रॅकरने प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केलं.

भारताच्या पराभवाचं कारण काय?

दरम्यान, या सामन्यात भारतीय संघाच्या पराभवाबाबत चर्चा सुरू आहे. अशातच भारताचा माजी क्रिकेटपटू आणि या सामन्यात समालोचन करणाऱ्या मोहम्मद कैफने भारताच्या पराभवाचं विश्लेषण केलं आहे. समालोचन करताना कैफ म्हणाला, भारताच्या संघव्यवस्थापनाने या सामन्यात आणखी एक जलदगती गोलंदाजाला संधी द्यायला हवी होती. भारताने पहिल्या डावात गोलंदाजी करताना सुरुवातीच्या २० पैकी ६ षटकं जलदगती गोलंदाजांकरवी खेळवली. तर उर्वरित १४ षटकं फिरकीपटूंनी टाकली. या २० षटकांमध्ये भारताला केवळ एक बळी मिळवता आला. हा बळी जलदगती गोलंदाज राज लिंबानी याने टिपला. तसेच या सामन्यात भारताकडून सर्वाधिक ३ बळी राजनेच टीपले. दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलियाने भारतापेक्षा वेगळी योजना आखली होती आणि त्या योजनेत कांगारू पूर्णपणे यशस्वी ठरले.

U19 World Cup Final : ऑस्ट्रेलियाच्या विजयात भारतीय वंशाच्या हरजस सिंगने बजावली मोठी भूमिका

ऑस्ट्रेलियाने पहिल्या २० षटकांपैकी १९ षटकं जलदगती गोलंदाजांकरवी खेळवली. तर केवळ एकाच षटकात फिरकीपटूचा वापर करण्यात आला. परिणामी पहिल्या २० षटकांत भारत केवळ ६८ धावा जमवू शकला. तसेच भारताचे चार फलंदाज माघारी परतले. तर ऑस्ट्रेलियाने पहिल्या २० षटकांत एका गड्याच्या बदल्यात ९० हून अधिक धावा जमवल्या होत्या. ही २० षटकंच सामन्याचं भवितव्य ठरवणारी होती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How india lost u19 world cup against australia mohammad kaif explains asc
Show comments