India Lowest Score in Test as They All out on 46 IND vs NZ Test: बंगळुरू कसोटीतील पहिल्या डावानंतर भारतीय संघ बॅकफूटवर आहे. गेल्या अनेक कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाने दाखवलेला दबदबा बेंगळुरूमध्ये दिसला नाही. जणू न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजांनी शरणागती पत्करली. भारताने नाणेफेक जिंकत अवघ्या ३१.२ षटकांत ४६ धावांवर सर्वबाद झाले. भारताचे ५ खेळाडू तर खातेही उघडू शकले नाहीत. भारताने घरच्या मैदानावर कसोटी खेळताना उभारलेली ही सर्वात कमी धावसंख्या आहे. भारताच्या या वाताहतीसाठी २ निर्णय कारणीभूत ठरले.
रोहित शर्माचा नाणेफेक जिंकल्यानंतरचा निर्णय (How India Were All Out For 46?)
भारतीय कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्याने चाहते आश्चर्यचकित झाले. गुरुवारी आणि शुक्रवारी बेंगळुरूमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता होती. अशा स्थितीत वेगवान गोलंदाजांना खेळपट्टीची मदत मिळेल याची खात्री होती. असे असतानाही रोहितने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, ज्याचा परिणाम टीम इंडियाच्या धावसंख्येवर दिसून आला. मॅट हेन्री, विल्यम ओ’रुक आणि टिम साऊदी या वेगवान गोलंदाजांच्या त्रिकुटासमोर भारतीय फलंदाज काही करू शकले नाहीत.
विराट कोहलीच्या फलंदाजीबाबत निर्णय
शुबमन गिल दुखापतीमुळे संघाबाहेर झाल्याने त्याच्या जागी सर्फराझ खानला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी दिली. गिल नसल्याने भारतीय संघाने विराट कोहलीला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना कोहलीचा रेकॉर्ड फार काही चांगला नाही. कसोटीत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना कोहलीला कधीही अर्धशतक झळकावता आलेले नाही. त्याची सरासरीही विशेष नसते. असे असतानाही कोहलीला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्यात आलं आणि त्याने नऊ चेंडू खेळून आपले खातेही उघडले नाही. आणि विल्यमस ओ रूकच्या गोलंदाजीवर बाद झाला.
हेही वाचा – कोण आहे विल्यम ओ रूक, केएल, विराटला शून्यावर केलं बाद अन् घरच्या मैदानावर भारताची उडवली दाणादाण
सामन्याला सुरूवात झाल्यापासूनच न्यूझीलंडचे खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करताना दिसले. न्यूझीलंडच्या खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाने भारतीय फलंदाजांना अडचणीत आणले. ग्लेन फिलिप्सने उत्कृष्ट झेल टिपत विराट कोहलीला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. तर डेव्हॉन कॉन्वेने एक्स्ट्रा कव्हरवर स्ट्रेच करताना अवघड असा झेल टिपत सर्फराझचा खानला बाद केले. यावर सर्फराझही आश्चर्यचकित झाला. न्यूझीलंड संघाकडून मेट हेन्रीने ५ विकेट्स, विल्यम ओ रूकने ४ विकेट्स तर साऊदीने १ विकेट घेत भारतीय फलंदाजांना मैदानात टिकू दिले नाही.