Kapil Dev on Virat and Rohit: भारतीय संघातील खेळाडू क्वचितच देशांतर्गत क्रिकेट खेळताना दिसतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू मोकळे असतानाही देशांतर्गत सामन्यांपासून (रणजी करंडक, विजय हजारे ट्रॉफी किंवा इतर देशांतर्गत स्पर्धा) दूर राहतात. त्याचवेळी रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे स्टार क्रिकेटपटू बऱ्याच दिवसांपासून डोमेस्टिक मॅच खेळलेले नाहीत. भारताचे माजी दिग्गज अष्टपैलू खेळाडू आणि १९८३चे विश्वचषक विजेता कर्णधार कपिल देव यांनी देशांतर्गत स्पर्धांमध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू न खेळल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी रोहित आणि कोहलीला काही प्रश्न विचारले आहेत.
कपिल देव यांचे माजी सहकारी आणि बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनीही आंतरराष्ट्रीय खेळाडूंना देशांतर्गत सामने खेळण्याचा सल्ला दिला होता पण, त्याबाबत पुढे फारसे काहीही झालेले नाही. टाइम्स ऑफ इंडियाशी संवाद साधताना कपिल देव यांना विचारण्यात आले की, “आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेट खेळले पाहिजे, असे बिन्नी म्हणाले होते. पण असे दिसते की याबाबत त्यांचे म्हणणे कोणीही मनावर घेतलेले दिसत नाही.”
माजी कर्णधार कपिल देव यांनी उत्तर दिले की, “देशांतर्गत क्रिकेट खूप महत्त्वाचे आहे. अलीकडच्या काळात विराट कोहली, रोहित शर्मा किंवा इतर कोणत्याही आघाडीच्या वरिष्ठ खेळाडूने किती देशांतर्गत सामने खेळले आहेत? एकही नाही. आशिया चषकाआधी तुम्ही एकतरी सामना खेळायला हवा होता. माझा विश्वास आहे की, अव्वल खेळाडूंनी देशांतर्गत सामने चांगले खेळले पाहिजेत जेणेकरून पुढील पिढीच्या खेळाडूंना त्यांच्याकडून शिकायला मदत होईल. जर त्यांचे अनुभव युवा खेळाडूंना मिळाले तर त्यांना त्यातून मिळेल.”
इंग्लंडचा बेसबॉल खेळ गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत आहे. इंग्लंड संघ अत्यंत आक्रमक शैलीत कसोटी क्रिकेट खेळतो, ज्याला बेसबॉल म्हणतात. अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध आक्रमक क्रिकेट खेळून इंग्लंडने बरीच वाहवा मिळवली. इतर संघांनीही याकडे लक्ष द्यावे, असा सल्ला कपिलने दिला आहे. भारतीय संघाचा नियमित कर्णधार असलेल्या रोहितलाही त्याने अधिक आक्रमक पध्दतीचा अवलंब करण्याचा सल्ला दिला आहे.
बझबॉल क्रिकेटवर कपिल देव यांनी मांडले मत
कपिल देव म्हणाले, “बझबॉल ही क्रिकेटमधील नवीन संकल्पना छान आहे. मी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अॅशेस मालिका पाहिली, जी अलीकडच्या काळातील सर्वोत्तम मालिकांपैकी एक होती. कसोटी क्रिकेट असेच खेळले गेले पाहिजे, असे माझे मत आहे. रोहित चांगला कर्णधार आहे पण त्याला अधिक आक्रमक होण्याची गरज आहे. आता इंग्लंडसारखे संघ कसे खेळतात याचा विचार टीम इंडियाला देखील करावा लागेल. फक्त आपणच नाही तर सर्व क्रिकेट खेळणाऱ्या देशांनी त्याच धर्तीवर विचार करायला हवा. सामने जिंकणे हे सर्व संघांचे प्राधान्य असले पाहिजे.” रोहित शर्माने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत ११३ प्रथम श्रेणी आणि ३१५ लिस्ट-ए श्रेणी सामने खेळले आहेत. दुसरीकडे विराट कोहलीने आतापर्यंत १४३ प्रथम श्रेणी आणि ३०९ लिस्ट-ए श्रेणी सामने खेळले आहेत.
रोहित आणि विराट टी२० संघापासून दूर जात आहेत
माहितीसाठी की, वेस्ट इंडिज दौऱ्यावर टीम इंडियाने तिन्ही फॉरमॅटमध्ये मालिका खेळली, ज्यामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह काही स्टार खेळाडू टी२० मालिकेचा भाग नव्हते. हार्दिक पांड्याने टी२० संघाची जबाबदारी स्वीकारली. या मालिकेत भारताला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी. त्याचवेळी टीम इंडिया १८ ऑगस्टपासून आयर्लंड दौऱ्यावर तीन सामन्यांची टी२० मालिका खेळणार असून या मालिकेतही रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे अनेक स्टार खेळाडू संघाचा भाग नाहीत. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आयर्लंड दौऱ्यावर भारताचे नेतृत्व करेल. दुखापतीमुळे बुमराह काही काळ संघाबाहेर होता, आता तो पूर्णपणे बरा झाला आहे.