विश्वचषक स्पर्धा २०१९ च्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताचे आव्हान संपुष्टात आल्यापासून माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले आहे. धोनीचे चाहते, धोनीमध्ये अजूनही क्रिकेट शिल्लक आहे अशी भावना व्यक्त करत, त्याने इतक्यात निवृत्त होऊ नये, अशी मागणी करत आहेत. पण धोनी मात्र विश्वचषकानंतर अद्याप क्रिकेटच्या मैदानावर उतरलेला नाही. IPL 2020 मध्ये धोनी आपल्या खेळीचा जलवा दाखवेल आणि झोकात टीम इंडियात पुनरागमन करेल अशाही चर्चा रंगल्या. पण दुर्दैवाने करोनामुळे IPL पुढे ढकलण्यात आले.

काही दिवसांपूर्वी #Dhoni Retires असा हॅशटॅग ट्रेंड झाला होता. मात्र धोनीची पत्नी साक्षी हिने त्या चर्चा निव्वळ अफवा असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे धोनी पुन्हा क्रिकेट खेळताना दिसणार हे चाहत्यांच्या मनात पक्के झाले. या दरम्यान, माजी निवड समिती सदस्य सय्यद किरमाणी यांनी धोनीची संघात निवड कशी झाली? याबद्दलचा एक किस्सा सांगितला.

“धोनीची संघात निवड कशी झाली याबद्दल मी कधीही कोणाला सांगितलेलं नाही. पण आता मी सांगतो. पूर्व विभागातील माझा निवड समिती सहकारी प्रणव रॉय यांच्यासोबत मी रणजी स्पर्धेतील सामना पाहत होतो. मला तो सामना कोणता होता ते नीटसं आठवत नाही कारण ती गोष्ट खूप जुनी आहे. प्रणव मला म्हणाला की झारखंडकडून खेळणार यष्टीरक्षक-फलंदाज खूप चांगला युवा फलंदाज आहे. संघात निवड होण्यासाठी तो पात्र उमेदवार आहे. मी प्रणवला विचारलं की तो आता किपिंग करतोय का? त्यावर प्रणव म्हणाला की तो आता फाईन लेगवर फिल्डिंग करतोय. त्यानंतर मी धोनीची मागील दोन वर्षातील आकडेवारी मागवली आणि मी खरंच ते पाहून आनंदी झालो. त्याची किपिंग न बघताच आम्ही थेट त्याला पूर्व विभागातून निवडलं आणि त्यानंतर त्याने इतिहास घडवला”, अशी आठवण किरमाणी यांनी हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना सांगितली.