कोणत्याही खेळामध्ये पंचांच्या भूमिकेला अत्यंत महत्व असतं. दोन्ही बाजूचे खेळाडू नियम मोडत नाहीत ना व सर्व सामना व्यवस्थित पार पाडणं ही पंचांची जबाबदारी असते. क्रिकेटमध्ये तर पंचांवर असणारं दडपण आपण अनेकदा अनुभवलं आहे. पायचीत, रनआऊट, नो-बॉल असे निर्णय देताना पंच नेहमी सावध राहून योग्य निर्णय देत असतात. आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी आयसीसीचं पंचांचं एलिट पॅनल असतं. ज्यात प्रत्येक देशातील चांगली कामगिरी करणाऱ्या पंचांना स्थान मिळतं. २०१९ साली इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत आयसीसीच्या पंचांच्या कामगिरीवर चांगलीच टीका झाली होती. यानंतर आयसीसीने एलिट पॅनलमधील काही पंचांची हकालपट्टी करत काही नियम बदलले.

मात्र या पंचांना मानधन किती मिळत असेल हा प्रश्न प्रत्येक क्रिकेट प्रेमीच्या मनात येत असेल. आज आम्ही तुम्हाला त्याचं उत्तर देणार आहोत. आयसीसीच्या एलिट पॅनलमधील पंचांचं वार्षिक मानधन हे ३५ हजार अमेरिकन डॉलर्स ते ४५ हजार अमेरिकन डॉलर्स त्या घरात असतं. (भारतीय रुपयांमध्ये अंदाजे २६ ते ३३ लाखांच्या घरात) कसोटी क्रिकेटमध्ये पंच म्हणून काम करताना एलिट पॅनलमधील पंचांना ३ हजार अमेरिकन डॉलर्स, टी-२० सामन्यासाठी १ हजार अमेरिकन डॉलर्स आणि वन-डे सामन्यासाठी २ हजार २०० अमेरिकन डॉलर्स असं मानधन मिळतं.

याव्यतिरीक्त आयसीसीच्या एलिट पॅनलमधील पंच हे जगभरातील टी-२० लिगमध्येही पंचांची भूमिका बजावतात. या स्पर्धांमधूनही पंचांना चांगलं मानधन मिळतं. उदाहरणार्थ आयपीएलमध्ये पंचांना प्रत्येक सामन्यासाठी २ हजार ५०० अमेरिकन डॉलर्सचं मानधन मिळतं. याव्यतिरीक्त एलिट पॅनलमधील पंचांना प्रवासासाठी बिजनेस क्लासचं तिकीट आणि हॉटेलमध्ये राहण्याची वेगळी व्यवस्था ही आयसीसीकडून केली जाते.