Ricky Ponting On Rishabh Pant: दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी पुष्टी केली आहे की संघ ऋषभ पंतच्या जागी विकेटकीपर फलंदाजाच्या शोधात आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत गेल्या महिन्यात कार अपघातात गंभीर जखमी झाला होता. सध्या त्यांच्यावर मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कार अपघातात पंतला गंभीर दुखापत झाली होती, त्यामुळे त्याला मैदानात परतण्यास बराच वेळ लागणार आहे.
टीम इंडियाचा यष्टिरक्षक सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर दुखापतीतून सावरत आहे. ऋषभ पंत ३० डिसेंबर रोजी एका रस्ता अपघातात गंभीर जखमी झाला होता. या अपघातामुळे पंत अनेक मोठ्या मालिका आणि टूर्नामेंटमधून बाहेर पडताना दिसत आहे. यापैकी एक म्हणजे इंडियन प्रीमियर लीग २०२३ जी एप्रिलपासून होणार आहे. पंतची अनुपस्थिती दिल्ली कॅपिटल्ससाठी साहजिकच मोठा धक्का आहे कारण तो संघाचा कर्णधार तसेच मोठा सामना विजेता आहे. दुखापतींमुळे पंत यंदाच्या मोसमात खेळू शकणार नाही, मात्र असे असतानाही संघाचे प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांना तो दिल्ली संघाच्या डगआउटमध्ये हवा आहे.
रिकी पाँटिंगने आयसीसीच्या वेबसाईटशी केलेल्या संभाषणात सांगितले की, पंत जरी खेळत नसला तरी त्याला डगआउट मध्ये रोज पाहायला आवडेल. पाँटिंग असं का म्हणाला? शेवटी, दिल्ली कॅपिटल्ससाठी पंतची उपस्थिती इतकी महत्त्वाची का आहे? पंतबद्दल रिकी पाँटिंगचे शब्द खरोखरच हृदयस्पर्शी आहेत. जाणून घेऊ या.
रिकी पाँटिंगने ऋषभ पंत बाबतीत केले भावनिक विधान
रिकी पॉन्टिंगने आयसीसीच्या वेबसाईटला सांगितले की, ‘मला आठवड्यातील प्रत्येक दिवशी पंत माझ्यासोबत डग आऊटमध्ये हवा आहे. जर तो आयपीएल दरम्यान आमच्यासोबत प्रवास करू शकला तर मला त्याला डग आऊटमध्ये पाहायला आवडेल. त्याच्या उपस्थितीचा संघावर सकारात्मक परिणाम होतो.
पंतसारखे खेळाडू झाडांवर उगवत नाहीत: पाँटिंग
रिकी पाँटिंग पुढे म्हणाला, “तुम्हाला पंतसारख्या खेळाडूचा पर्याय मिळू शकत नाही. असे खेळाडू झाडांवर उगवत नाहीत. आम्हाला ते पारखी नजरेने शोधून आणावे लागतात आणि त्यांच्यातील टॅलेंटला योग्य पैलू पाडून, कौशल्य ओळखून आम्ही तयार करतो. आम्हाला यष्टीरक्षक-फलंदाज हवा आहे. पंतची जागा कोण घेऊ शकतो यावर आम्ही सध्या शोध घेत आहोत.”
टीम इंडियालाही ऋषभ पंतची उणीव भासणार
दिल्ली कॅपिटल्सच नाही तर टीम इंडियालाही या चॅम्पियन खेळाडूची उणीव भासणार आहे. पुढील महिन्यापासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ कसोटी सामन्यांची मालिका सुरू होत आहे. ऋषभ पंतच्या अनुपस्थितीमुळे ऑस्ट्रेलियन संघाला नक्कीच दिलासा मिळाला आहे. कारण या खेळाडूने आपल्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला त्याच्या घरच्या मैदानावर पराभूत केले होते. गब्बामधील पंतच्या खेळीने ऑस्ट्रेलियाकडून सामना आणि मालिका दोन्ही हिसकावून घेतले. साहजिकच पंतची टीम इंडियात अनुपस्थिती ही कांगारू गोलंदाजांसाठी दिलासा देणारी बाब आहे.