Wimbledon 2024 Prize Money List : स्पेनचा २१ वर्षीय खेळाडू कार्लोस अल्काराझने विम्बल्डन २०२४ मध्ये ऐतिहासिक विजय नोंदवला. त्याने अंतिम सामन्यात सर्बियन दिग्गज नोव्हाक जोकोविचचा पराभव करून सलग दुसऱ्यांदा हे विजेतेपद पटकावले आहे. या विजेतेपदासह कार्लोस अल्काराझवर पैशांचा पाऊस पडला. विम्बल्डन २०२४ फायनल जिंकल्यानंतर त्याला किती कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळाले, ते जाणून घेऊया?
कार्लोस अल्काराझला बक्षिसाची रक्कम किती मिळाली?
स्पेनच्या २१ वर्षीय कार्लोस अल्काराझने विम्बल्डन २०२४ मध्ये सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले आहे. त्याने अंतिम सामन्यात अनुभवी नोव्हाक जोकोविचचा पराभव करून ही कामगिरी केली. त्याने जोकोविचचा सरळ सेटमध्ये ६-२, ६-२, ७-६ अशा फरकाने धूळ चारली. विम्बल्डन २०२४ पुरुष एकेरी विजेत्या कार्लोस अल्काराझला बक्षीस रक्कम म्हणून ३,४२७,३९६ पौंड (२८ कोटी ३५ लाख रुपये) मिळाले. तर उपविजेता नोव्हाक जोकोविचलाही बक्षीस म्हणून घसघशीत रक्कम मिळाली.त्याला १,४००,००० पौंड (१४ कोटी ७० लाख रुपये) मिळाले. गेल्या वर्षी विम्बल्डन २०२३ विजेत्या अल्काराझला २५ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम देण्यात आली होती.
विम्बल्डन २०२४ एकेरी विजेत्या खेळाडूंना मिळालेली बक्षीस रक्कम –
विजेता: २८ कोटी ३५ लाख रुपये
उपविजेता: १४ कोटी ७० लाख रुपये
उपांत्य फेरी: ७ कोटी ७५ हजार रुपये
उपांत्यपूर्व फेरी: ३ कोटी ९३ लाख ७५ हजार रुपये
चौथी फेरी: २ कोटी ३७ लाख ३० हजार रुपये
तिसरी फेरी: १ कोटी ५० लाख १५ हजार रुपये
दुसरी फेरी : ९७ लाख ६५ हजार रुपये
पहिली फेरी: ६३ लाख रुपये
हेही वाचा – Wimbledon 2024 : सचिन तेंडुलकरकडून चॅम्पियन अल्काराझचे कौतुक; म्हणाला, ‘आता टेनिस विश्वावर फक्त…’
अल्काराझ आणि जोकोविचची लढत कशी होती?
विम्बल्डन २०२४ च्या अंतिम सामन्यात स्पेनच्या कार्लोस अल्काराझने पहिल्या दोन सेटमध्ये जोकोविचचा सहज पराभव केला. त्याने पहिले दोन सेट ६-२, ६-२ असे जिंकले, पण नंतर तिसरा सेट जिंकण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला. तिसरा सेट टायब्रेकरपर्यंत गेला, ज्यामध्ये कार्लोसने कारकिर्दीतील चौथे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले. कार्लोसने यूएस ओपन २०२२, विम्बल्डन २०२३, फ्रेंच ओपन २०२४ जिंकले आणि आता विम्बल्डन २०२४ जिंकले.