भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी२० मालिकेला मंगळवारी (२० सप्टेंबर) मोहाली येथे सुरुवात झाली. टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या सामन्यात खेळला नाही. दुखापतीनंतर संघात परतलेल्या बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे. यानंतर चर्चेला जोर आला की तो अजून जखमी आहे का? बुमराह पुन्हा जखमी आहे का? विश्वचषकापूर्वी त्याला संघात आणण्यासाठी निवडकर्त्यांची घाई आहे का?
दुखापतीमुळे बुमराह आशिया चषकमध्ये खेळला नव्हता. त्याची अनुपस्थिती भारतीय संघाने चुकवली. भारतीय संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या नाणेफेकीदरम्यान कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, बुमराहला या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. तो दुसरा आणि तिसरा सामना खेळू शकेल अशी आशा आहे. दुखापतीमुळे आशिया चषकमध्ये न खेळलेल्या हर्षल पटेलने पुनरागमन केले, मात्र बुमराहने पुनरागमन केले नाही.
सामना संपल्यानंतरच्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने असा प्रश्न विचारला की, “ टी२० विश्वचषक २०२२ च्या दृष्टीने महत्त्वाचा गोलंदाज जसप्रीत बुमराहबाबत भारतीय संघ घाई करत आहे का?”, त्यावर रोहित शर्माने बुमराहाच्या न खेळण्याबाबत पुनरुच्चार केला म्हणाला की.” तो पूर्णपणे तंदुरुस्त असून त्याला फक्त या सामन्यासाठी विश्रांती दिली होती.” भारताने ऋषभ पंतचाही प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केलेला नाही याबाबतही विचारले असता, “आम्ही आमची त्यादिवसाची परिस्थिती काय याचा विचार करून संघ निवड करतो.”
दोन्ही संघातील या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २०८ धावांचा डोंगर उभारला. केएल राहुलने ५५ तर सूर्यकुमार यादव याने ४६ धावांचे योगदान दिले. अखेरीस हार्दिक पंड्याने तुफानी फटकेबाजी करत अवघ्या ३० चेंडूवर ७१ धावा कुटल्या. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला कॅमेरून ग्रीनने ६१ धावांची वादळी खेळी करत सामन्यात कायम राखले. अखेरीस मॅथ्यू वेडने नाबाद ४६ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. मालिकेतील दुसरा सामना २३ सप्टेंबर रोजी नागपूर येथे खेळला जाईल.