३० वर्षांनंतर मुख्य फुटबॉल स्पध्रेत प्रवेश
१९७२ नंतर युरो २०१६ स्पध्रेसाठी पात्र
महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये ३० वष्रे खेळू न शकलेल्या हंगेरी फुटबॉल संघाने सोमवारी ही वेस ओलांडली. युरोपियन फुटबॉल स्पध्रेच्या पात्रता फेरीत हंगेरीने बुडापेस्ट येथील ग्रुपामा अरेनावर झालेल्या परतीच्या सामन्यात नॉर्वेवर २-१ असा विजय साजरा करून युरो २०१६ स्पर्धेसाठी पात्र ठरण्याचा मान मिळवला. १९८६च्या मेक्सिको विश्वचषक स्पध्रेनंतर हंगेरी पहिल्यांदा मोठय़ा आंतरराष्ट्रीय स्पध्रेकरिता पात्र ठरला आहे, तर १९७२नंतर हंगेरी युरोपियन अजिंक्यपद स्पध्रेकरिता पात्र ठरला आहे.
तमॅस प्रिस्कीनच्या पहिल्या गोलनंतर नॉर्वेच्या मार्कस हेन्रीकसेन याच्या स्वयंगोलने हंगेरीला ३-१ अशा सरासरी गोलफरकाच्या जोरावर युरो स्पध्रेत खेळण्याची संधी मिळाली. हंगेरीने पहिल्या साखळी सामन्यात नॉर्वेवर १-० असा विजय मिळवला होता. त्यामुळे या लढतीत बरोबरीही त्यांना युरो २०१६ स्पध्रेची पात्रता मिळवण्यासाठी पुरेशी होती. १४व्या मिनिटाला तमॅस कॅडरने दिलेल्या लांब पासवर पेनल्टी क्षेत्रात उभ्या असलेल्या प्रिस्कीनने गोल करून हंगेरीला १-० अशी आघाडी मिळवून दिली. पुढच्याच मिनिटाला गेर्गो लोव्हरेन्कॅसिसच्या पासवर लॅस्जलो क्लेइन्हेस्लेरचा गोल करण्याचा प्रयत्न फसला. त्यानंतर नॉर्वेकडून असे दोन प्रयत्न झाले, परंतु त्यांना यश मिळाले नाही. मध्यंतरापर्यंत हंगेरीने १-० अशी आघाडी कायम राखली होती.
मध्यंतरानंतर सुरुवातीला सामन्यात फार चुरस पाहायला मिळाली नाही. दोन्ही संघ बचावात्मक खेळ करताना दिसले. अखेरच्या २० मिनिटांत सामन्याला वेग आला. हंगेरीने गोलजाळीवर जणू हल्लाबोलच केला, परंतु त्यांच्या हाती यश येत नव्हते. ८२व्या मिनिटाला मात्र हंगेरीचा गोल करण्याचा प्रयत्न हाणून पाडण्याच्या नादात नॉर्वेच्या हेन्रीकसेनने चेंडू स्वत:च्याच गोलजाळीत टाकला. त्याच्या या स्वयंगोलने हंगेरीला २-० अशी आघाडी मिळवून दिली. ८७व्या मिनिटाला हेन्रीकसेनने गोल करून चुकीची भरपाई केली. मात्र, तोपर्यंत हंगेरीचा विजय निश्चित झाला होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा