इंग्लंडवर विजय
अभेद्य बचाव आणि अचूक आक्रमकता या रणनीतीने मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने तगडय़ा इंग्लंडवर २-१ असा विजय मिळवून जागतिक हॉकी लीग अंतिम स्पध्रेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. व्ही. आर. रघुनाथ आणि तलविंदर सिंग यांनी भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. गोलरक्षक पी. आर. श्रीजेशने पुन्हा एकदा अभेद्य भिंत असल्याचे प्रत्यय घडवले आणि इंग्लंडचे गोल करण्याचे प्रयत्न हाणून पाडले.
तिसऱ्या मिनिटापासून भारताने आक्रमणाला सुरुवात करताना इंग्लंडच्या गोलजाळीवर हल्ला चढवला. इंग्लंडच्या फिल रॉपरने चोख प्रत्युत्तर देताना यजमानांच्या पेनल्टी क्षेत्रावर चाल केली, मात्र रुपिंदरपाल सिंगने रॉपरचे प्रयत्न हाणून पाडले. पहिल्या सत्रामध्ये दोन्ही संघांनी बचावात्मक खेळ करताना गोलशून्य बरोबरी साधली.
१९व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर भारताने कोणतीही चूक न करता गोल केला. रघुनाथच्या या गोलने यजमानांनी १-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर इंग्लंडकडूनही आक्रमक खेळ झाला, परंतु गोलरक्षक पी. आर. श्रीजेशची अभेद्य भिंत त्यांना पार करण्यात अपयश आले. मध्यंतरापर्यंत भारताने १-० अशी आघाडी कायम राखली होती. ३९व्या मिनिटाला मध्य रेषेवरून मिळालेल्या पासवर तलविंदरने इंग्लंडची बचाव फळी भेदून भारतासाठी दुसरा गोल केला. पुढच्याच मिनिटाला पंचांनी इंग्लंडला पेनल्टी कॉर्नर बहाल केले. या निर्णयाविरोधात भारताने तिसऱ्या पंचाकडे विचारणा केल्यानंतर हा निर्णय बदलण्यात आला. ५२व्या मिनिटाला सिमॉन मँटेलने गोल करून इंग्लंडचे आव्हान कायम राखण्याचा प्रयत्न केला. अखेरच्या दहा मिनिटांत दोन्ही संघांकडून आक्रमक खेळ झाला, परंतु भारताने विजय निश्चित केला.
जागतिक हॉकी लीग अंतिम स्पर्धा : भारत उपांत्य फेरीत
तिसऱ्या मिनिटापासून भारताने आक्रमणाला सुरुवात करताना इंग्लंडच्या गोलजाळीवर हल्ला चढवला.
First published on: 04-12-2015 at 01:25 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hwl final 2015 india enter semis with 2 1 win over great britain