भारतातील आणि मुख्यत: महाराष्ट्रातील वाढत्या करोनाच्या प्रकरणांमुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएलच्या चौदाव्या हंगामाबाबत एक निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने आयपीएलचे सामने खेळवण्याबाबत हैदराबादला एक पर्यायी स्थळ (standby venue) म्हणून ठेवले आहे. महाराष्ट्र लॉकडाऊनच्या मार्गावर आहे. शिवाय, मुंबईत करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. यासंदर्भात कोणतेही अधिकृत निवेदन समोर आले नसले तरी, महाराष्ट्र राज्य सरकारकडून लॉकडाऊन होण्याचे संकेत देण्यात आले आहेत.
यंदाच्या आयपीएलसाठी सहा शहरे निश्चित करण्यात आली आहेत. पहिल्या टप्प्यातील सामने चेन्नई आणि मुंबई, दुसऱ्या टप्प्यातील सामने अहमदाबाद आणि दिल्ली, तर, अंतिम टप्प्यातील सामने बंगळुरू आणि कोलकाता येथे खेळवण्यात येणार आहेत. प्ले ऑफ आणि अंतिम सामने मेच्या अखेरीस अहमदाबादमध्ये होणार आहेत.
मात्र, ईएसपीएनक्रिकइन्फोच्या अहवालानुसार, ही सहा शहरे आयपीएल आयोजनाचा अयशस्वी ठरली तर बॅक अप पर्याय म्हणून हैदराबाद असेल. हैदराबादसोबत इंदूरचाही विचार करण्यात आला आहे. अहवालात असे म्हटले आहे की, मंडळाने कोणत्याही फ्रेंचायजीशी संभाव्य बदलांविषयी चर्चा केलेली नाही. हे सामने प्रेक्षकंशिवाय रंगणार आहेत.
मागील वर्षी करोनाच्या उद्रेकामुळे आयपीएलचे आयोजन यूएईत करण्यात आले. मात्र, यंदा आयपीएल भारतात खेळवण्यात येणार आहे. या वर्षाच्या अखेरीस भारत टी-20 विश्वचषकाचेदेखील आयोजन करणार आहे.
आयपीएल’च्या 14व्या हंगामाला 9 एप्रिलपासून प्रारंभ होणार असून, मुंबईत पहिला सामना 10 एप्रिलला चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळवण्यात येईल.
वानखेडे स्टेडियमचे 8 कर्मचारी करोना पॉझिटिव्ह
आयपीएल हंगाम सुरु होण्याआधीच मुंबईच्या वानखेडे स्टेडियमचे 8 ग्राऊंड्समॅन करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. या स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात 10 एप्रिलला सामना होणार आहे. या सामन्याशिवाय एकूण या स्टेडियमवर आयपीएलचे एकूण 10 सामने आयोजित करण्यात आले आहेत.