वेस्ट इंडिजला भारताविरुद्धचा पहिला सामना आपल्या धडाकेबाज नाबाद शतकाच्या जोरावर मार्लन सॅम्युअल्सने जिंकवून दिला, या खेळीचे श्रेय त्याने वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार क्लाइव्ह लॉइड आणि धडाकेबाज फलंदाज विवियन रिचर्ड्स यांना दिले आहे. सामन्यापूर्वी मी लॉइड आणि रिचर्ड्स यांच्याशी संवाद साधला आणि त्यांनी माझा आत्मविश्वास वाढवला, असे मत सॅम्युअल्सने व्यक्त केले.
‘‘सामन्याच्या पूर्वसंध्येला मी लॉइड आणि रिचर्ड्स यांच्याशी चर्चा केली. मी नेहमीच त्यांच्याकडून सल्ला घेत असतो. एका रात्रीमध्ये ते महान क्रिकेटपटू झालेले नाहीत. त्यामुळे त्यांचा सल्ला माझ्यासाठी नेहमीच अमूल्य असतो, त्यांच्या सल्ल्यामुळेच माझा आत्मविश्वास वाढला. यापूर्वी सराव सामन्यात माझ्याकडून चांगली फलंदाजी झाली होती आणि त्याचाच मला या सामन्यात चांगलाच फायदा झाला. या सामन्याला फलंदाजीला जाताना त्यांचे सल्ले मी लक्षात ठेवले  आणि त्याचा फायदा झाला,’’ असे सॅम्युअल्सने सांगितले.

Story img Loader