भारतीय वन-डे आणि टी-२० संघाचा उप-कर्णधार सध्या विश्रांती घेतो आहे. श्रीलंकेविरुद्ध टी-२० सामन्यांच्या मालिकेत रोहितची भारतीय संघात निवड झालेली नाहीये. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत तो भारतीय संघात पुनरागमन करेल. रोहित सध्या आपल्या परिवारासोबत वेळ घालवतो आहे, यादरम्यान त्याने पीटीआय वृत्तसंस्थेला खास मुलाखत दिली.
“मी सध्या पत्नी आणि मुलीसोबत चांगला वेळ घालवतो आहे. लोकं बाहेर माझ्याबद्दल काय बोलतात याचा मी विचार करत नाही. मुलीच्या जन्मानंतर माझं आयुष्य बदललंय, त्यामुळे सध्या मी टीकेपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो. कोण माझ्याविषयी काय चांगलं बोलतंय-वाईट बोलतंय याकडे लक्ष देण्याच्या पुढे मी गेलो आहे. आता या सर्व गोष्टींमुळे काहीच फरक पडत नाही.” आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला १२ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमीत्ताने रोहित मुलाखतीमध्ये आपल्या खेळाविषयी बोलत होता.
रोहितच्या अनुपस्थितीत शिखर धवनची भारतीय संघात निवड झालेली आहे. श्रीलंकेविरुद्धचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे शिखर धवनकडे मोजक्या संधी उपलब्ध आहेत. २०१९ वर्षात शिखरची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. त्यामुळे भारतीय संघात रोहितसोबत सलामीला कोण येणार यावरुन आता नवीन चर्चांना उधाण आलेलं आहे. सध्या विश्रांतीवर असलेला रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे मालिकेत पुनरागमन करेल.