India vs Australia World Cup Final 2023: विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून सहा गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवावर अनेक दिग्गज क्रिकेटपटूंची वक्तव्ये समोर येत आहेत. दरम्यान, सुनील गावसकर यांनी संघाबाबत मोठी गोष्ट सांगितली आहे. सुनील गावसकर यांनी टीम इंडियाचा अभिमान असल्याचं म्हटलं आहे. संपूर्ण स्पर्धेत टीम इंडियाने फायनल वगळता एकही सामना गमावलेला नाही. अशा स्थितीत जेतेपदाच्या लढतीत पराभूत होणे हा संघातील खेळाडूंसाठी मोठा धक्का आहे. सामन्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्व गुणांचे गावसकर यांनी कौतुक केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यात लाज वाटण्यासारखे काही नाही- सुनील गावसकर

टीम इंडियाच्या अंतिम सामन्यातील कामगिरीवर माजी भारतीय फलंदाज सुनील गावसकर म्हणाले की, “मला माझ्या संघाचा अभिमान आहे आणि तो सर्व भारतीयांना वाटला पाहिजे. मी नक्कीच निराश झालो आहे पण आम्हाला भारतीय संघाचा अभिमान असायला हवा. काहीवेळा निर्णय हे ते तुमच्या बाजूने जात नाही, पण तो टीम इंडिया उत्कृष्ट क्रिकेट खेळली. मला त्यांचा खूप अभिमान आहे. चांगल्या संघाकडून हरण्यात लाज वाटण्यासारखे काहीही नाही. आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ जबरदस्त खेळला. चाहत्यांना सांगू इच्छितो की, मी निराश झालो आहे पण यात लाजिरवाणी गोष्ट नाही. अशावेळी आपण सर्वांनी खंबीरपणे भारतीय संघाच्या पाठिशी उभे राहणे गरजेचे आहे.”

हेही वाचा: IND vs AUS Final: मोहम्मद शमीच्या पाठीमागील शुक्लकाष्ट काही संपेना; एकीकडे भारताचा पराभव, दुसरीकडे आईची तब्येत बिघडली

२००३चा बदला भारतीय संघाला घेण्यात अपयश

२० वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाने विश्वचषकाच्या अंतिम फेरीत टीम इंडियाचा पुन्हा एकदा पराभव करून जखमेवरील खपली काढली आहे. या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडिया निर्धारित ५० षटकात २४० धावांवर गडगडली. भारताकडून के.एल. राहुलने सर्वाधिक ६६ धावा केल्या. विराट कोहलीने ५४ धावा केल्या. याशिवाय कर्णधार रोहित शर्माने ४७ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. २४१ धावांचा पाठलाग करणे ऑस्ट्रेलियासाठी खूप सोपे ठरले. लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाने ४३ षटकात २४१ धावा करत सामना जिंकला. ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वन डे विश्वचषक ट्रॉफीवर नाव कोरले आहे.

हेही वाचा: IND vs AUS Final: अंतिम फेरीतील पराभवानंतर रोहित-सिराजला अश्रू अनावर; सचिन तेंडुलकरने केले टीम इंडियाचे सांत्वन

वाईट आठवणी पुन्हा जिवंत झाल्या

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात संघाचा पराभव होताच २३ मार्च २००३च्या वाईट आठवणी ताज्या झाल्या आहेत. २३ मार्च २००३च्या विश्वचषक फायनलमध्ये ऑस्ट्रेलियन संघाने भारताचा १२५ धावांनी पराभव करून विजेतेपदाचे स्वप्न धुळीस मिळवले होते, हे कोणीही विसरू शकणार नाही. त्यावेळी टीम इंडियाचा कर्णधार सौरव गांगुली होता. २००३च्या विश्वचषकात सचिन तेंडुलकरने सर्वाधिक ६७३ धावा केल्या होत्या. या पराभवामुळे तमाम भारतीय चाहतेही दु:खी झाले होते. आज पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत करून हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I am disappointed but no shame sunil gavaskar boosted the morale of team india in this manner avw