विश्वचषक संघासाठी पर्यायी जलदगती गोलंदाजाची निवड अद्याप संपलेली नसल्यामुळे बीसीसीआयच्या निवड समितीने उमेश यादवला आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी उमेशची भारतीय संघात निवड करण्यात आलेली आहे. यावेळी उमेश यादवने आपल्या ट्विटर हँडलवर एक सुचक वक्तव्य करत, आपण मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उचलणार असल्याचं सांगितलं आहे.
I’m going to always rise above the doubt that may exist about me.
— Umesh Yaadav (@y_umesh) February 15, 2019
२०१८ हे वर्ष उमेश यादवसाठी फारसं चांगलं गेलं नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांनी जलदगती गोलंदाजीची धुरा समर्थपणे वाहिली. त्यामुळे कसोटी सामने खेळलेल्या उमेशला मर्यादीत षटकांच्या सामन्यात संधी मिळाली नाही. मात्र रणजी करंडकात विदर्भाकडून चांगली कामगिरी केल्यानंतर निवड समितीने उमेशची टी-२० संघासाठी निवड केली आहे. आपलं कौशल्य सिद्ध करण्याची उमेशकडे ही अखेरची संधी असणार आहे. तुमच्या प्रत्येक शंकांवर मात करुन मी उभा राहीन असं वक्तव्य उमेश यादवने केलं आहे.
सध्या भारतीय संघात जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार यांचं स्थान पक्क मानलं जात आहे. भारताकडे हार्दिक पांड्या हा एकमेव अष्टपैलू पर्याय उपलब्ध आहे. अशावेळी पर्यायी गोलंदाज म्हणून सिद्धार्थ कौल आणि खलिल अहमद असे दोन पर्याय शिल्लक राहतात. त्यामुळे संघात आपलं स्थान पक्क करण्यासाठी उमेश यादवला मिळालेल्या संधीचं सोन करणं गरजेचं बनलेलं आहे.