भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार आणि एक काळ भारतीय हॉकीचा कणा मानला जाणारा सरदार सिंह सध्या संघात जागा कायम राखण्यासाठी धडपडतो आहे. मध्यंतरीच्या काळात दुखापतीमुळे त्याला संघाबाहेरही बसावं लागलं होतं. मात्र आपल्यातला खेळ अजुनही संपला नसल्याचं सरदार सिंहने म्हटलं आहे. नवी दिल्लीत पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सरदार बोलत होता.

अवश्य वाचा – हॉकी इंडियाला मिळालं ओडीशा सरकारचं प्रायोजकत्व, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ५ वर्षांचा करार

“टोकीयो ऑलिम्पिकपर्यंत मी भारतासाठी हॉकी खेळत राहीन हे मी याआधी स्पष्ट केलं आहे. २०१९ मध्ये आम्हाला महत्वाच्या स्पर्धा खेळायच्या नाहीयेत. त्यामुळे हॉकी विश्वचषकापर्यंत मी माझा खेळ सुधारुन संघात नक्की पुनरागमन करेन.” वर्ल्ड हॉकीलीग फायनल आणि न्यूझीलंड दौऱ्यात सरदारची भारतीय संघात निवड झालेली नव्हती. मात्र आता आपण शाररिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याचं सरदारने स्पष्ट केलं.

अवश्य वाचा – हॉकी विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ भारतात येणार

आगामी काळात भारतीय संघाला अझलन शहा हॉकी, राष्ट्रकुल आणि आशियाई खेळ या महत्वाच्या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवायचा आहे. यासाठी भारतीय संघात स्थान मिळाल्यास आपली सर्वोत्तम कामगिरी करण्याचा मानस सरदार सिंहने व्यक्त केला आहे. यावेळी सरदारने भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक जोर्द मरीन यांनी स्विकारलेल्या रोटेशन पॉलिसीचंही कौतुक केलं. प्रत्येक खेळाडूला संघात जागा मिळणं गरजेचं आहे. ज्यावेळी माझी संघात निवड झालेली नव्हती त्यावेळी मला प्रशिक्षकांनी याची कल्पना दिलेली होती, असंही सरदार म्हणाला.