भारतीय क्रिकेट संघाच्या व्यस्त वेळापत्रकाबद्दल कर्णधार विराट कोहलीने अखेर आपलं मौन सोडलं आहे. मी यंत्रमानव नसून एक खेळाडू आहे, त्यामुळे मलाही विश्रांतीची गरज असल्याचं विराट कोहलीने पत्रकार परिषदेत सांगितलं. भारतीय संघातला प्रत्येक खेळाडू एका वर्षात अंदाजे ४० सामने खेळतो. त्यामुळे प्रत्येकाला काही दिवसांची विश्रांती मिळणं गरजेचं असतं. यंदाच्या हंगामात मी देखील अविरतपणे क्रिकेट खेळत आलोय, त्यामुळे मलाही विश्रांतीची गरज असल्याचं विराट कोहली म्हणाला. श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघ उद्यापासून पहिला कसोटी सामना खेळणार आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर होणाऱ्या सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत कोहली बोलत होता.
न्यूझीलंडविरुद्ध मालिका सुरु असताना विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेत विश्रांती मागितली होती. मात्र, निवड समितीचे सदस्य एम. एस. के. प्रसाद यांनी कोहलीने विश्रांती मागितल्याच्या बातम्या अफवा असल्याचं म्हणलं होतं. विराटने श्रीलंकाविरुद्ध सर्व कसोटी सामन्यांसाठी आपण उपलब्ध असल्याचं कळवलं होतं. त्यानुसारच श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली असल्याचं निवड समितीने स्पष्ट केलंय.
अवश्य वाचा – विराट कोहलीच्या आग्रहाखातर क्रिकेटपटूंची जनुकीय चाचणी
पत्रकार परिषेदत हार्दिक पांड्याला देण्यात आलेल्या विश्रांतीबद्दल प्रश्न विचारला असता कोहली म्हणाला, “नक्कीच, इतरांप्रमाणे मलाही विश्रांतीची गरज आहे. ज्यावेळी मला थकल्यासारखं वाटेल त्यावेळी मी हक्काने विश्रांती मागून घेईन. मी यंत्रमानव नाहीये, मलाही अनेक दुखापती होतात. त्यामुळे योग्य वेळ येताच मी देखील विश्रांती घेईन.” श्रीलंकेविरुद्ध ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेला उद्यापासून सुरुवात होणार आहे. श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघाने कसोटी, वन-डे आणि टी-२० अशा तिनही प्रकारात श्रीलंकेवर मात केली होती. त्यामुळे घरच्या मैदानावर झालेल्या आपल्या पराभवाचा वचपा काढण्याचा श्रीलंकेच्या संघाचा प्रयत्न असणार आहे.
अवश्य वाचा – ज्या पदार्थांचं सेवन करत नाही, त्यांची जाहीरात करणार नाही – विराट कोहली