Shubaman Gill on IND vs PAK: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार युवा फलंदाज शुबमन गिलने आशिया चषक २०२३सुपर-४ मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी एक विधान केले आहे. वास्तविक, शुबमन म्हणाला की, “भारतीय फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजी आक्रमणाविरुद्ध फारसे खेळलेले नाहीत, त्यामुळे त्यांचा सामना करताना थोडा संघर्ष करावा लागत आहे.” १० सप्टेंबर रोजी कोलंबो येथे भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सुपर-४ सामना होणार आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना शुबमन गिलने शाहीन शाह आफ्रिदीच्या गोलंदाजीचे कौतुक केले. तो म्हणाला की, “जेव्हा तुम्ही या स्तरावर खेळत असता, तेव्हा तुम्ही तुमच्या कारकिर्दीत कोणत्याही टप्प्यावर डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाचा सामना करावा लागेल, हे डोक्यात ठेवायला हवे. मात्र, माझ्यासारख्या अनेक युवा खेळाडूंनी याआधी कधीही भारतीय संघात आल्यापासून डाव्या हाताच्या गोलंदाजीचा सामना केलेला नाही. खासकरून जेव्हा तुम्ही पाकिस्तानविरुद्ध कमी खेळता तेव्हा त्यांची शैली माहिती नसते. इतर संघांच्या तुलनेत पाकिस्तानविरुद्ध सावधगिरीने खेळावे लागते. त्यांच्याकडे दर्जेदार गोलंदाजी आक्रमण आहे. जेव्हा तुम्हाला अशा प्रकारच्या जबरदस्त गोलंदाजी आक्रमणाचा सामना करावा लागतो तेव्हा त्याची सवय नसल्याने खूप फरक पडतो.”
शुबमन गिल पुढे म्हणाला की, “होय, तुम्ही चांगल्या फॉर्ममध्ये खेळत असाल आणि अशा घातक गोलंदाजीचा सामना जेव्हा तुम्हाला करावा लागतो आणि तुम्ही त्यात अपयशी होतात तेव्हा, तुमच्या फलंदाजी तंत्राबद्दल प्रश्न विचारले जातात. मात्र, यात तुम्ही त्यांच्या गोलंदाजीचे कौतुक करायला हवे. पाकिस्तानचे खेळाडू हे आधीपासून गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहेत. शाहीन, नसीम, हारिस विकेट घेण्यासाठी जातात. नवीन चेंडूने ते स्विंगचा उपयोग अधिक करतात. तुम्हाला काही खराब चेंडू मिळतील त्यावेळी त्याचा फायदा उठवणे महत्वाचे आहे. जेव्हा तुम्ही चांगले खेळता तेव्हा काही गोष्टी तुमच्या बाजूने जातात. तुम्हाला फक्त तुमच्या खेळावर विश्वास ठेवावा लागेल आणि मोठ्या धावा करत राहिले पाहिजे.”
शुबमन गिलचे बाबरबाबत मोठे विधान
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमबद्दल गिल म्हणाला, “होय, नक्कीच आम्ही त्याला फॉलो करतो. जेव्हा एखादा खेळाडू चांगली कामगिरी करत असतो. तो इतके चांगले का करत आहेत, त्याची खासियत काय आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रत्येकजण त्यांच्यावर लक्ष ठेवून असतो. बाबरच्या बाबतीतही हीच गोष्ट लागू पडते. तो जागतिक दर्जाचा खेळाडू आहे आणि त्याचप्रमाणे आपणही व्हावं आणि आपली कोणतरी प्रशंसा करावी हीच तर प्रत्येक खेळाडूची इच्छा असते.”
शाहीन आणि नसीमचे गिलने केले कौतुक
गिलने शाहीन आणि नसीम शाह यांच्या गोलंदाजीबद्दल बोलताना सांगितले की, “नसीम शाहचे चेंडू हे खूप वेगवान असतातच पण ते अधिक स्विंगदेखील होतात. शाहीनच्या बाबतीत मी आधी म्हटल्याप्रमाणे तो एकाच टप्प्यावरून इनस्विंग आणि आउटस्विंग अशी दोन्ही प्रकारची गोलंदाजी करतो. त्याची पहिले चार षटके ही खूप महत्वाची आहेत. ती तुम्ही व्यवस्थित खेळून काढलीत तर मग सेट झाल्यावर धावगती वाढवता येऊ शकते.” ५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकात संघ आपली भूमिका आणि फलंदाजीची स्थिती, याबाबत स्पष्टता असल्याचेही गिल म्हणाला.
रोहितच्या फलंदाजीबद्दल तो म्हणाला की, “ रोहित भाई असा फलंदाज आहे जो मोठे फटके खेळून गोलंदाजांवर दबाव आणतो. दुसरीकडे, मी क्वचितच हवेत शॉट्स खेळतो. मी आक्रमक फटके खेळतो पण जेव्हा गरज असेल तेव्हाच. आम्ही नेहमी एकमेकांना मदत करतो. रोहित भाई आणि मी, आम्ही दोघेही वेगवेगळ्या धाटणीचे खेळाडू आहोत. त्यामुळे विरोधी संघाला आमच्याविरोधात गोलंदाजी करणे अवघड जाऊ शकते.”
टीम इंडियाच्या फलंदाजीबाबत शुबमन गिल पुढे म्हणाला, “आमची योजना सारखीच असेल, सलामीला एक भक्कम आधार प्रदान करणे आणि नंतर वर्चस्व राखणे. पाकिस्तानविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात आमच्या टॉप ऑर्डरने चांगली कामगिरी केली नाही. पण तरीही, आम्ही २६६ धावा केल्या आणि अशा विकेटवर कधीतरी ३१०-३२० धावांची गरज नसते. एवढ्या धावा देखील अशा प्रकारच्या खेळपट्टीवर सामना जिंकवून देणारे ठरू शकतात.”