Piyush Chawla response to Prithvi Shaw his retirement : भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज पीयुष चावलाने नुकतेच विराट – रोहितबाबत एक वक्तव्य केले, जे चर्चेत आहे. ३५ वर्षीय चावला म्हणाला होता की, शुबमन-ऋतुराज गायकवाड हे टीम इंडियाचे भावी विराट कोहली आहेत. तसेच त्याने या मुलाखतीत अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यामुळे तो चर्चेत आहे. या मुलाखतीत त्याने रोहित शर्माच्या कर्णधारपदाचेही खूप कौतुक केले. याशिवाय त्याने पृथ्वी शॉशी संबंधित एक किस्साही सांगितला, ज्यामध्ये त्याला निवृत्ती घेण्याचा सल्ला देण्यात आला होता.
पीयुष चावलाच्या उत्तराने पृथ्वी शॉ अवाक –
पीयुष चावलाने शुभंकर मिश्राच्या यूट्यूब चॅनलवर पृथ्वी शॉशी संबंधित एक सांगितला. तो म्हणाला की, मी एकदा पृथ्वी शॉशी बोलत होतो. तो मला म्हणाला, पीसीभाई आता बस करा आणि निवृत्ती घ्या. यावर पीयुषचावलाने दिलेल्या उत्तराने पृथ्वी अवाक झाला. पीयुष चावला म्हणाला, मी सचिन पाजीसोबत क्रिकेट खेळलो आहे. आता त्यांच्या मुलासोबत खेळतोय. त्यामुळे तुझ्या मुलाबरोबर खेळून निवृत्त होईन. पीयुष चावलाचे हे ऐकून पृथ्वी शॉ पुढे काहीच बोलू शकला नाही.
पीयुष चावला अजूनही सक्रिय क्रिकेटपटू
पीयुष चावला अजूनही सक्रिय क्रिकेटपटू म्हणून आयपीएलमध्ये खेळत आहे. त्याने आपला शेवटचा आयपीएल सामना मुंबई इंडियन्सकडून लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध खेळला होता. याशिवाय तो अद्याप टीम इंडियातून निवृत्त झालेला नाही. वयाच्या ३५ व्या वर्षीही पीयुष चावलाची गोलंदाजीची धार कायम आहे. त्यामुळे लिलावात तो नेहमीच प्रत्येक फ्रँचायझीचा पसंतीचा खेळाडू असतो.
हेही वाचा – IND vs PAK : भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात आला नाही तर…’, मोईन खानने दिला इशारा
पीयुष चावलाच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, तो टीम इंडियासाठी ३ कसोटी, २५ एकदिवसीय आणि ७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. चावलाने कसोटी क्रिकेटमध्ये ७ विकेट्स घेतल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने ३२ विकेट्स घेतल्या आहेत, तर आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये ४ विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय पीयुष चावलाने आयपीएलमध्ये १९१ सामन्यात १९१ विकेट्स घेतल्या आहेत.