‘‘अमली पदार्थांच्या व्यापाराशी आपला काहीही संबंध नाही. आपल्यावर करण्यात आलेले आरोप खोडसाळपणाचे आहेत,’’ असे ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता बॉक्सर विजेंदरसिंग याने येथे सांगितले.
झिरकपूर येथे नुकतेच एका अनिवासी भारतीयास अमली पदार्थ बाळगल्याबद्दल पंजाब पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून १३० कोटी रुपये किमतीचे २६ किलो हेरॉइन जप्त करण्यात आले. ज्या इमारतीत त्याला ताब्यात घेण्यात आले, त्या इमारतीबाहेर विजेंदरच्या पत्नीची मोटार उभी होती. त्यामुळे त्याचा या प्रकरणात हात असावा असा आरोप काही वृत्तवाहिन्यांनी केला होता. या आरोपांचे खंडन करीत विजेंदर म्हणाला, मला अतिशय आश्चर्याचा धक्का बसला. सध्या मी मुंबईत असून माझ्या मित्रांनी मला दिल्ली विमानतळावर या मोटारीतून मला सोडले. ती मोटार तेथे कशी आली हे मला येथे बसून सांगता येणार नाही. या मोटारीतून काहीही सापडले नसल्याचा खुलासा पोलिसांनी यापूर्वीच केला आहे तसेच त्यांनी माझ्याशी संपर्कही साधलेला नाही. तरीही काही वृत्तवाहिन्या मला हेतूपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
फत्तेहगड साहिब विभागाचे पोलीस उपनिरीक्षक हरदयालसिंग मान यांनी सांगितले,की झिरकपूर येथे अनिवासी भारतीय अनुपसिंग कहलान व त्याचा सहकारी कुलविंदरसिंग यांना पकडण्यात आले. पोलिसांनी त्यांच्याकडून १३० कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त केले. विजेंदर व त्याचा जिवलग मित्र रामसिंग यांच्याशी आपली दोस्ती असल्याचे कहलान याने पोलिसांना सांगितले आहे.
यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना विजेंदर म्हणाला,की अमली पदार्थाचे सेवन करणारा काहीही बडबड करतो आणि त्यावर विश्वास ठेवला जातो याचेच मला आश्चर्य वाटते. पोलिसांनी याबाबत खुलासा केला असून आपला त्याच्याशी काहीही संबंध नसल्याचेही स्पष्ट केले आहे.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा