‘‘मुंबईचा संघ भारतात सर्वात प्रतिष्ठेचा मानला जातो, २००७-०८ साली १६ वर्षांखालील स्पर्धेचे विजेतेपद पटकावून वानखेडेवर रणजीचा अंतिम सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये बसलो होतो. तेव्हा एक स्वप्न मी पाहिले, मुंबईच्या संघातून खेळायचे. आज काही वर्षांनंतर मी मुंबईच्या रणजी संघात होतो, त्याच वानखेडेवर अंतिम फेरीत खेळणाऱ्या मुंबईच्या संघात मी होतो. रणजी विजेतेपदाबरोबरच संपूर्ण मोसमात यष्टीमागे सर्वाधिक बळी मिळवण्याचा विक्रम मनात घोळत होताच. पण सामना जिंकायचाच, हे पहिले ध्येय होते. सामना जिंकलो, तेव्हा खरेच काही सुचले नाही. नि:शब्दच झालो, सारेच विजयाचा आनंद व्यक्त करत होतो. आनंद गगनात मावतच नव्हता!’’ या शब्दांत मुंबईचा यष्टीरक्षक-फलंदाज आदित्य तरे याने चाळिसावे विजेतेपद पटकावल्यावर आपल्या भावना व्यक्त केल्या.
रणजीच्या एका मोसमात यष्टीपाठी ४१ बळी पटकावण्याचा विक्रम पंजाबच्या उदय कौरच्या नावावर होता. आदित्यने सोमवारी या विक्रमाची बरोबरी केली. या विक्रमाबद्दल आदित्य म्हणाला की, ‘‘सुलक्षण कुलकर्णी यांच्यासारखे मुंबईचे माजी यष्टीरक्षक मला प्रशिक्षक म्हणून लाभले आणि त्याचा मला चांगलाच फायदा झाला. या सामन्यापूर्वी विक्रमाचा विचार माझ्या डोक्यात होता, सुलक्षण सरही मला याबद्दल सांगत होते. विक्रमाची बरोबरी करून संघासाठी योगदान देऊ शकलो, याचा आनंद नक्कीच आहे. गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केल्यामुळे मी या विक्रमाची बरोबरी करू शकलो. त्याचबरोबर किरण मोरे यांच्या मार्गदर्शनाचाही मला यावेळी फायदा झाला.’’
‘‘जेव्हापासून मी क्रिकेट खेळायला लागलो, तेव्हापासून घरच्यांचा मला चांगलाच पाठिंबा मिळाला. आज मी जे काही आहे ते कुटुंबीयांमुळेच आहे. जेव्हा फलंदाजी करतो तेव्हा धावा किती जास्त करता येतील, हे डोक्यात असते, जेव्हा यष्टीरक्षण करत असतो तेव्हा यष्टीमागे कशी चांगली कामगिरी करता येईल, याचा विचार असतो. आयपीएलचा मला चांगलाच फायदा झाला, आंतरराष्ट्रीय खेळाडूंबरोबर खेळताना बरेच काही शिकलो. पण आयपीएलमुळे गेल्या तीन वर्षांत मला वाणिज्य शाखेच्या तृतीय वर्षांची परीक्षा देता आलेली नाही. पण क्रिकेटबरोबरच शिक्षणालाही मी महत्त्व देतो,’’ असे आदित्यने सांगितले.

Story img Loader