क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय)च्या टेनिस कोर्टवर चालू असलेल्या ज्युनिअर आयटीएफ टेनिस स्पध्रेत हैदराबादची युवा टेनिसपटू वैष्णवी रेड्डी सर्वाचे लक्ष वेधून घेत आहे. दोन ज्युनिअर राष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धाची जेतेपदे नावावर असलेल्या वैष्णवीला मुंबईतील स्पर्धेच्या जेतेपदाचे वेध लागले आहेत. वेगवान सव्‍‌र्हिस करण्यात पटाईत असलेली १७ वर्षांची वैष्णवी हैदराबादचे रणजी क्रिकेटपटू पार्थसारथी रेड्डी यांची कन्या. त्यामुळे खेळाचे संस्कार तिच्यावर बालपणीपासूनच घडले. आता वडिलांप्रमाणेच खेळामध्ये नाव कमविण्याचे ध्येय तिने समोर ठेवले आहे.
नीळकंठेश्वर आणि त्यांचा मुलगा तेजस्वी यांच्या अकादमीत वैष्णवी टेनिसचे धडे गिरवते. टेनिसकडे कशी वळली, याविषयी वैष्णवी म्हणाली की, ‘‘मी ११व्या वर्षी टेनिस खेळायला सुरुवात केली. घराजवळच्या क्लबमध्ये जलतरणासाठी मी जात असे. तेथील टेनिस कोर्ट्समुळे टेनिसची गोडी लागली आणि हाच खेळ खेळण्याचा निर्णय मी घेतला.’’
‘‘पुढच्या वर्षीपासून मी वरिष्ठ गटातून खेळेन. यासाठी खेळात सातत्य राखण्याचे आव्हान माझ्यासमोर आहे. दबावाच्या क्षणी शांतपणे खेळ करण्याचे तसेच बॅकहँड आणि नेटजवळचा खेळ सुधारण्याचे माझे उद्दिष्ट आहे. परदेशात टेनिस प्रशिक्षणात तंदुरुस्तीला फार महत्त्व दिले जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावण्यासाठी तंदुरुस्तीवर लक्ष देण्याचा प्रयत्न असेल. खांद्याच्या दुखापतीमुळे माझे नुकसान झाले. त्यावेळी प्रशिक्षक आणि कुटुंबीय खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिले. दुखापतीमुळे मी अधिक कणखर झाले,’’ असे वैष्णवीने यावेळी सांगितले.    
टेनिस : प्रांजला याडलापल्ली, वैष्णवी रेड्डीची आगेकूच
मुंबई : सीसीआय-आयटीएफ कनिष्ठ १८ वर्षांखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत प्रांजला याडलापल्लीने तिसऱ्या मानांकित स्नेहादेवी एस रेड्डीला पराभवाचा धक्का देत उपांत्य फेरीत धडक मारली. गेल्या वर्षी अखिल भारतीय मानांकन स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या १३ वर्षीय प्रांजलाने स्नेहादेवीला ६-३, ७-६(३) असे नमवले. उपांत्य फेरीत तिचा मुकाबला इजिप्तच्या हाना मॉर्टेजीशी होणार आहे. दुसऱ्या लढतीत श्री वैष्णवी पेड्डी रेड्डीने वासंती शिंदेचा ६-२, ६-२ असा धुव्वा उडवला. उपांत्य फेरीत वैष्णवीची लढत कझाकिस्तानच्याकाटेरिना गुबानोव्हाशी होणार आहे. मुलांमध्ये सर्बियाच्या गोरान मार्कोव्हिकने कझाकिस्तानच्या अलेक्सी नेस्टरोव्हवर २-६, ६-४, ७-५ अशी मात केली. चायनीज तैपेईच्या चि-चुन तसेच गार्वित बात्रा आणि कझाकिस्तानच्या दिमित्री पॉपको यांनीही उपांत्य फेरीत आगेकूच केली.