कसोटी क्रिकेटसाठीच माझा जन्म झाला आहे. आखूड टप्प्यांचे चेंडू खेळणे हा माझा कच्चा दुवा होता, पण त्यावर मी मेहनत घेतली असून त्यामध्ये चांगलीच सुधारणा झाली आहे. एक चांगला कसोटी क्रिकेटपटू मी होऊ शकतो, हे सिद्ध करून दाखवेन, असे मत भारतीय संघातून इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी संघातून डच्चू मिळालेल्या सुरेश रैनाने व्यक्त केले.
मी कसोटी क्रिकेटसाठीच जन्मलो आहे, हे मला माहिती आहे. कसोटी क्रिकेटमध्ये मी चांगली कामगिरी केली आहे. गेल्या वर्षी वेस्ट इंडिज दौऱ्यावर मी चांगली कामगिरी केली, त्याचबरोबर इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्यातही माझी कामगिरी चांगली झाली होती. सध्या मी अथक मेहनत घेत आहे. सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर येऊन फलंदाजी करणे सोपे नसते. जर मला संधी मिळाली तर नक्कीच मी एक चांगला कसोटीपटू आहे हे मी सिद्ध करून दाखवेन, असे रैना म्हणाला.
तो पुढे म्हणाला की, लोकं मला एकदिवसीय क्रिकेटचा खेळाडू समजतात, त्यांना जे काही बोलायचे आहे ते बोलू दे. गेल्या ८-९ डावांमध्ये मी फिरकी गोलंदाजीवर बाद झालो आहे आणि त्यावर मी मेहनत घेत आहे. देशासाठी ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय सामने मी जिंकून दिले आहेत, पण कसोटी क्रिकेटमध्ये मात्र अजूनही तशी संधी मला मिळालेली नाही. काही जण म्हणतात की, मला आखूड टप्प्यांचे बाऊन्सर खेळता येत नाहीत, पण जर तसे असले असते तर वेस्ट इंडिज आणि इंग्लंडविरुद्घ मी चांगल्या खेळी साकारू शकलो नसतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा