भारतीय बॅडमिंटन म्हणजे केवळ सायना नेहवाल नाही याचा प्रत्यय पुरुष बॅडमिंटनपटू आपल्या शानदार खेळाद्वारे देत आहेत. हैदराबादचा बी. साईप्रणीथ हा अशाच गुणी नवोदित खेळाडूंपैकी एक. काही दिवसांपूर्वीच त्याने महान खेळाडू तौफिक हिदायत तसेच जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या हाँगकाँगच्या ह्य़ु युनवर विजय मिळवला होता. या विजयांनी आत्मविश्वास उंचावलेल्या साईप्रणीथने आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे जेतेपद पटकावू शकतो असा विश्वास व्यक्त केला.
अव्वल भारतीय खेळाडूंबरोबर सरावाची संधी मिळते. याचा प्रामुख्याने फायदा झाल्याचे साईप्रणीथने सांगितले. गोपीचंद अकादमीत भारतातले जवळपास सर्वच अव्वल खेळाडू आहेत. त्यांच्याबरोबर खेळण्याचा अनुभव मोलाचा ठरतो. कश्यपने जागतिक क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. जेव्हा आम्ही त्याच्याविरुद्ध खेळतो, तेव्हा माझ्यासारख्या युवा खेळाडूला कामगिरीत सुधारणा करायला मदत होते, असे त्याने पुढे सांगितले.
कश्यप, श्रीकांत यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धाची जेतेपदे पटकावली होती. अथक मेहनत केल्यानंतर त्यांना हे यश मिळाले आहे. त्यांच्या यशाने आम्हाला प्रेरणा मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धाचे जेतेपद पटकावू शकतो असा विश्वास मिळाला आहे. सामन्याच्या विशिष्ट दिवशी तुम्ही कशी कामगिरी करता यावर सारे काही अवलंबून असते.
तौफिक हिदायतसारख्या महान खेळाडूला नमवणे हे स्वप्नवत होते. सामन्याच्या वेळी तौफिकला प्रेक्षकांचा प्रचंड पाठिंबा होता. मी सुरुवातीला दडपणाखाली होतो. यामुळे पहिल्या गेममध्ये माझी कामगिरी खराब झाली. मात्र त्यानंतर मी चुका टाळत सर्वोत्तम खेळ केला. त्यामुळेच विजय मिळवू शकलो.
या दिमाखदार विजयामुळे साईप्रणीथने सोळा स्थानांनी झेप घेतली आहे. तो जागतिक क्रमवारीत ४५व्या स्थानी आहे. अव्वल ३० मध्ये धडक मारण्याचे उद्दिष्ट असल्याचे साईप्रणीथने सांगितले.
तंदुरुस्ती, वेग, कोर्टवरचा वावर, फटक्यांतील वैविध्य या बारकाव्यांवर प्रशिक्षक गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असल्याचे त्याने पुढे सांगितले.