कर्णधार महेंद्रसिंह धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून कधी निवृत्ती घेतो याविषयी अनेक ठिकाणी चर्चा सुरु असतात. २०१९ विश्वचषकात भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर धोनीवर निवृत्तीसाठी दबाव वाढत होता. मात्र धोनीने अद्यापही अधिकृतपणे आपल्या निवृत्तीविषयी भाष्य केलेलं नाहीये. मध्यंतरी वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिकेत धोनीला पर्याय म्हणून संघात जागा मिळालेल्या पंतने फलंदाजीत निराशा केली, यावेळी धोनीला पुन्हा संघात जागा देण्याविषयी मागणी होऊ लागली. या पार्श्वभूमीवर पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलत असताना धोनीने, एक खेळाडू म्हणून आपल्याला कोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतं याविषयी भाष्य केलं.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनी ‘कॅप्टन कूल’ नावाने ओळखला जातो. तुलनेत भारतीय संघाचा सध्याचा कर्णधार विराट कोहली हा नेहमी आक्रमक असतो आणि कित्येकदा त्याच्या या स्वभावाचं दर्शन सर्व क्रिकेटप्रेमींना झालेलं आहे. मात्र मी देखील इतरांसारखाच आहे, फक्त मैदानात मी स्वतःवर नियंत्रण ठेवतो, पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत धोनी बोलत होता. “मी असं म्हणेन, मलाही इतरांप्रमाणे नैराश्य येतं. मलाही कधीकधी राग येतो, पण या सर्व भावना कधीही कायम नसतात. त्या क्षणी एक कर्णधार किंवा खेळाडू म्हणून काय करणं गरजेचं आहे हे माझ्यासाठी नेहमी महत्वाचं असतं. आता यापुढे मी काय करु? कोणत्या खेळाडूला संधी द्यायची याबद्दल विचार करायला लागलो की सर्व भावनांमधून मी बाहेर येतो.”
सध्या महेंद्रसिंह धोनी भारतीय संघाबाहेर आहे. काही प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातमीनुसार धोनी दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत भारतीय संघ व्यवस्थापनाने ऋषभ पंतला विश्रांती देत वृद्धीमान साहाला संधी दिली. आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं करत साहानेही पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये यष्टींमागे चांगली कामगिरी केली आहे. त्यातचं ऋषभ पंतच्या फलंदाजीतल्या अपयशावर निवड समितीसह प्रशिक्षक रवी शास्त्रीही नाराज असल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे आगामी काळात निवड समिती ऋषभ पंतला संधी देते की महेंद्रसिंह धोनी संघात पुनरागमन करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.